प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांची माहिती
पुणे ः पुणे जिल्ह्यात चालू वर्षीच्या २०२५-२६ च्या हंगामात १५ साखर कारखान्यांकडून १ कोटी ६७ लाख १८ हजार मे.टनाइतके अपेक्षित ऊस गाळप होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात गतवर्षी २०२४-२५ मध्ये १ कोटी ४ लाख ४६ हजार मे.टनाइतके ऊस गाळप कारखान्यांनी पूर्ण केले होते. याचा विचार करता गतवर्षीपेक्षा यंदा सुमारे ५३ लाख टनांनी ऊस गाळप वाढण्याचा प्राथमिक अंदाज पुणे प्रादेशिक सह संचालक नीलिमा गायकवाड यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात गतवर्षी बंद असलेला अनुराज शुगर्स हा खाजगी कारखाना यंदाचा ऊस गाळप हंगाम घेणार आहे. त्यामुळे चालू वर्षी ९ सहकारी व ६ खाजगी मिळुन १५ साखर कारखाने सूरू राहतील आणि या कारखान्यांकडून ऊस गाळप परवान्यासाठी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता सुमारे १ लाख ४ हजार ५०० मे.टनाइतकी आहे. याचा विचार करता १६० विवस साखर कारखान्यांचा हंगाम सुरू राहू शकतो.
जिल्ह्यात बारामती अॅग्रो या खाजगी कारखान्याकडून सर्वाधिक २१ लाख मे.टन उसाचे गाळप केले जाणार असून त्या खालोखाल दौंड शुगर या खाजगी कारखान्याकडून १५.७३ लाख मे.टन गाळप केले जाणार आहे. तर त्यानंतर माळेगाव सहकारी व कर्मयोगी कडूनही प्रत्येकी १५ लाख मे.टन गाळपाचा प्राथमिक अंदाज आहे. तर सोमेश्वरकडून १३.९७ लाख मे.टन ऊस गाळप अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. (पुढारी, ०२.११.२०२५)