विस्तारीकरणाचे काम पूर्ण, ३५०० रूपये दर जाहीर
कसबा बावडा ः येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून कारखान्याचा चालू गळीत हंगाम सोमवार दि. २६ जानेवारी पासून सुरू झाला आहे. कारखाना यंदा प्रतिटन ३५०० रूपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
कारखान्याच्या अत्यंत कमी जागेत हा प्रकल्प उभारणे म्हणजे अडचणीचे काम होते. या वर्षांमध्ये सलग पाच महिने झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच कारखान्याकडे असणार्या अपुर्या जागेमुळे जुनी मशिनरी काढून नवीन मशिनरी उभारणीस थोडा विलंब लागल्याने गळीत हंगाम सुरू होण्यास विलंब झाला. पुढील काळात मात्र जास्तीत जास्त गाळप करण्याकरिता आधुनिकीकरण प्रकल्पाचा आपणास फायदा होणार असल्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी सांगितले.
कारखान्यामार्फत शासनाच्या मान्यतेने १८.५ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्प व मशिनरी आधुनिकीकरणाचे काम हाती घेतले होते. त्यानुसार आधुनिकीकरणाची संपूर्ण कामे पूर्ण आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या. कारखान्याच्या सभासदांनी आपल्या कारखान्याच्या गाळप हंगामासाठी ऊस राखून ठेवून सहकार्य केले आहे. त्यांच्या या विश्वासास पात्र राहून इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देणार असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक यांनी सांगितले. (लोकमत, २५.०१.२०२६)