थकीत एफआरपीसाठी शेतकर्यांना करावी लागतेय प्रतीक्षा
माळीनगर ः मागील गाळप हंगाम संपून ६ महिन्यांचा कालावधी झाला आहे. आगामी ऊस हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तरीही सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांना थकीत एफआरपी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८०.९१ कोटी रूपये एफआरीप थकीत असल्याचे साखर आयुक्तालयाकडील अहवालावरून दिसते.
गतवर्षी राज्यात २०० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये ८५५ लाख मे.टन उसाचे गाळप झाले होते. या उसाची २४ हजार ५११ कोटी रूपये एफआरपी शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. तथापि, राज्यातील ६० काराखान्यांंकडे जुलैअखेर अद्यापही ३८७ कोटी रूपयांची एफआरपी थकली आहे.
एफआरपी थकविण्ययात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. अहिल्यानगर दुसर्या तर कोल्हापूूर जिल्हा तिसर्या स्थानावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३३ कारखान्यांनी मागील गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये १ कोटी ४ लाख ७६ मे.टन उसाचे गाळप होऊन ८८ लाख २८ हजार ७७६ क्विंंटल साखर उत्पादन झाले होते. जिल्ह्यात गाळप झालेल्या उसाचे २ हजार ७१६ कोटी रूपये शेतकर्यांना मिळाले आहेत.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ९ कारखान्यांकडे ८१ कोटी रूपये एफआरपी थकीत असलयाचे दिसून येत आहे. हंगाम सुरू होताना जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस मिळविण्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी २७०० ते ३५०० रूपयांदरम्यान उसाचा पहिला हप्ता जाहीर केला होता.
हंगाम संपल्यावर रिकव्हरीनुसार बहुतांश साखर कारखान्यांची एफआरपी त्यांनी जाहीर केलेल्या ऊस दरापेक्षा कमी निघाली. जाहीर केलेल्या ऊस दराप्रमाणे केवळ १४ कारखान्यांनीच शेतकर्यांना ऊस बिले दिली आहेत. १९ कारखान्यांकडे प्रत्यक्षात अजूनही २१७ कोटी रूपयांची ऊस बिले अडकली आहेत. (अॅग्रोवन, १२.०८.२०२५)
जिल्हानिहाय थकीत एफआरपी (कोटीत)
जिल्हा कारखाने थकीत
सोलापूर ०९ ८०.९१
अहिल्यानगर ०७ ५७.९०
कोल्हापूर ०८ ३८.८१
पुणे ०४ ३१.९१
सांगली ०५ २७.००
सातारा ०३ २५.९७
जालना ०३ २४.४३
परभणी ०४ २२.८१
हिंगोली ०३ २१.२८
लातूर ०४ १८.२५
नांदेड ०४ १५.२२
नाशिक ०१ ०९.२९
धाराशिव ०२ ०४.९७
बीड ०३ ०४.५६