anekant.news@gmail.com

9960806673

सांगली जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवर उसाची लागवड

सांगली ः जिल्ह्यात मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे आडसाली हंगामातील ऊस लागवडीला अडथळे निर्माण झाले होते. मात्र, अशा परिस्थितीतही शेतकर्‍यांनी लागवड केली आहे. जिल्ह्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ३३ हजार ३१० हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. ३३ हजार ३१० हेक्टरपैकी २५ हजार ४७७ हेक्टरखाली आडसालीचे क्षेत्र आहे. शेतकरी साखर उसाच्या लागवडीची नोंदणी करत आहेत, अशी माहिती कृषी विभागाने दिली.
जिल्ह्यात मे पासून ऑक्टोबर अखेर १०९ टक्के पाऊस झाला. सततच्या पावसाचा फटका आडसाली हंगामातील ऊस लागवडीला बसला आहे. शेतात पाणी साचल्याने लागवडीचे नियोजन विस्कळित झाले होते. अशा परिस्थितीतही शेतकर्‍यांना या हंगामातील लागवड केली आहे. दरम्यान पूर्व हंगामातील ऊस लागवडीचा कालावधी ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून प्रारंभ होतो. परंतु या काळातही पाऊस होता. त्यामुळे काही अंशी लागवडीला अडचणी आल्या होत्या. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.
पूर्व हंगामातील उसाची लागवड जवळपास संपली आहे. सुरू हंगामातील ऊस लागवड १५ दिवसांत सुुरू होईल. यादृष्टीने शेतकरी लागवडीची पूर्व तयारी करू लागला आहे. पलूस तालुक्यात सर्वाधिक लागवड झाली आहे.
यंदा दुष्काळी तालुक्यात प्रामुख्याने पूर्व आणि सुरू हंगामातील उसाची लागवड होते. यंदा आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने यंदाच्या हंगामात या तालुक्यात उसाचे क्षेत्र वाढेल असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. (अ‍ॅग्रोवन, ०४.१२.२०२५)