पुणे ः पेट्रोलमधील वाहनास २० टक्के इथेनॉल मिश्रण केल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. उलट देशातील शेतकर्यांना १.०४ लाख कोटींंपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे. यामुळे ग्रामीण उत्पन्नाचे स्त्रोत बळकट झाले आहेत, असा दावा वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (विस्मा) केला आहे.
इथेनॉल मिश्रणामुळे प्रतिकुल परिणाम होत असल्याचे माध्यमातून चर्चिले जात आहे. या पाश्वभुमीवर विस्माचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे व कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी ही भीती निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. इथेनॉल दुष्परिणामाचे मुद्दे केंद्रिय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने देखील फेटाळले आहेत.
जुन्या वाहनांमध्येही इथेनॉल वापरल्याने इंजिन, इंधन कार्यक्षमता किंवा टिकाऊपणावर प्रतिकुल परिणाम होत नाही. विविध शास्त्रीय चाचण्यांमधून तसे सिद्ध झालेले आहे. इथेनॉल मिश्रण कार्यक्रमांद्वारे शेतकर्यांना सक्षम बनवणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि देशाची ऊर्जा सुरक्षा वाढवणे शक्य झाले आहे. क
कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन केवळ इथेनॉल मिश्रणामुळे ७०० लाख टनाने घटले आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी झाले. तसेच २०१४ पासून परककीय चलनात १.२ लाख कोटींची बचत झाली आहे, असे विस्माने म्हटले आहे. साखर उद्योगाला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवण्यात इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाची भूमिका सुरूवातीपासून मोलाची ठरली आहे. यामुळे शेतकर्यांना उसाचे पैसे वेळेवर मिळण्याची खात्री झाली. त्यातून सरकारी आर्थिक मदतीवरील अवलंबित्व कमी झाले, असे विस्माने म्हटले आहे.
इथेनॉल वाढीकरिता कारखाने कटिबद्ध - इथेनॉल आता देशाच्या जैवइंधन धोरणाचा आणि ग्रामीण परिवर्तनाचा एक आधारस्तंभ बनले आहे. साखर उद्योग आता राष्ट्रीय इथेनॉल धोरणाशी पूर्णपणे सुसंगत अशी कामगिरी बजावतो आहे. त्यामुळे या धोरणाला बळकटी देण्यासाठी व इथेनॉल उत्पादन वाढविण्याकरिता साखर कारखाने कटिबद्ध आहेत, असेही विस्माचे म्हणणे आहे. (अॅग्रोवन, १०.०८.२०२५)