औसा ः श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामात १ लाख ५० हजार मे.टन गाळपाचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करून विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. काटेकोर नियोजन, आधुनिक यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर आणि शेतकरी व कारखाना प्रशासन यांच्यातील उत्तम समन्वय यामुळे हे उद्दिष्ट वेळेत साध्य झाले असून संपूर्ण परिसरात समाधाने वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या कारखान्यात दररोज सरासरी २८०० ते २९०० मे.टन प्रतिदिन इतक्या क्षमतेने अखंड गाळप सुरू आहे. विशेष म्हणजे यंदा साखर उताराही समाधानकारक आणि चांगला मिळत असल्याने कारखान्याच्या आर्थिक स्थितीला भक्कम आधार मिळाला आहे. कारखाना प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलासा देत स्पष्ट केलेे आहे, की ज्या शेतकर्यांचा ऊस अद्याप शिल्लक आहे त्यांनी कोणतीही चिंता करू नये. शेवटच्या शेतकर्याचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे. या आश्वासनामुळे शेतकर्यांमध्ये विश्वास आणि समाधानाची भावना अधिक बळावली आहे. (एकमत, २५.०१.२०२६)