बीएमआयच्या अहवालात साखर निर्यातबंदीची शक्यता व्यक्त
पुणे ः पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्याची मागणी उद्योगांनी केली आहे. पण यंदाच्या मॉन्सूनवर एल निनोचे सावट असून एकंदर शेती उत्पादन घटण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातच इथेनॉल निर्मिती वाढल्यास साखरेचे उत्पादन कमी होईल आणि सरकारला निर्यातबंदी करावी लागेेल, अशी शक्यता बीएमआय या संशोधन संस्थेने व्यक्त केली आहे.
भारताने इथेनॉलचे ई-२० चे उद्दिष्ट साध्य केले आहे. पण देशात विकसित झालेल्या इथेनॉल निर्मिती क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही. देशात जवळपास २ हजार कोटी लिटर इथेनॉल निर्मितीची क्षमता आहे. परंतु तेल विपणन कंपन्यांनी केवळ १ हजार ४८ कोटी लिटरची मागणी केली आहे. उद्योगांनी मात्र मोठा निधी खर्च करून क्षमता वाढविली आहे. त्यामुळे सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी उद्योगांनी केली आहे.
फिच सोल्यूशनच्या बीएमआयने आपल्या अहवालात इथेनॉल निर्मिती वाढल्यास सरकारला साखर निर्यातबंदी करावी लागेल, असे म्हटले आहे. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्यासाठी उद्योगांकडून दबाव येत आहे. पण आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची किंमत वाढण्याचा अंदाज आहे. त्यातच देशात इथेनॉलसाठी साखरेचा वापर वाढल्यास किंमत नियंत्रणासाठी सरकारला निर्यातबंदी करावी लागू शकते, असे या अहवालात म्हटले आहे. अर्थात पेट्रोलियम मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सध्यातरी २० टक्केच राहणार असल्याचे सांगितले.
एफआरपीची थकबाकी - १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झालेल्या चालू गाळप हंगामात मार्चच्या शेवटपर्यंत १ लाख ७ हजार कोेटी रूपये किमतीच्या उसाचे गाळप झाले. त्यापैकी कारखान्यांनी ८४ टक्के एफआरपी अदा केली. तर १६ हजार ९१८ कोटी रूपये कारखान्यांकडे थकीत आहेत. इथेनॉल निर्मितीला चालना दिल्यास थकबाकीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले. साखर उद्योगाने जवळपास १ हजार कोटी लिटर इथेनॉलची क्षमता तयार केली आहे. तर तेल विपणन कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात २८८ कोटी लिटरची मागणी केली आहे. यापैकी ४६ टक्के इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. तर धान्य आधारित इथेनॉलचा ७५९ कोटी लिटर मागणीच्या तुलनेत ३१ टक्के पुरवठा केला आहे, असेही साखर उद्योगाच्या सूत्रांनी सांगितले.
साखर दरात सुधारणा शक्य - जागतिक बाजारात साखरेच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीएमआयच्या अहवालानुसार सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची किंमत १४.६ डॉलर प्रति बुशेल्स आहे. एप्रिल ते जून दरम्यान हा भाव १६.२ डॉलर आणि जुलै ते सप्टेंबर दरम्यान १६.६ टक्के, तसेच ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान १७.२ डॉलर प्रति बुशेल्स भाव राहण्याची शक्यता आहे. तर हंगामातील सरासरी १६.२ डॉलर राहण्याच अंदाज बीएमआयने व्यक्त केला आहे.
एल निनोचे सावट - यंदाच्या मॉन्सून हंगामावर एन निनोचे सावट आहे. २०२३-२४ मध्ये एल निनोमुळे पावसात ६ टक्के तूट येऊन २०२४-२५ च्या गाळप हंगामात साखर उत्पादन कमी होऊन २६१ लाख टनांवर स्थिरावले होते. भारतातील ऊस उत्पादनात ९ टक्के घट झाली होती. तर थायलंडच्या ऊस उत्पादनात त्या वेळी १५ टक्के घट झाली होती. त्यामुळे साखरेच्या किमती दशकातील विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. यंदाही एल निनोचे सावट आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणााम होऊ शकतो, असा अंदाज बीएमआयने व्यक्त केला आहे.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले तरी ते २७ टक्क्यांपर्यंत वाढवणे शक्य आहे. वाहनांच्या इंजिनची तेवढी क्षमता आहे. पण त्यात टप्प्याटप्प्याने म्हणजेच आधी २२ टक्के, २५ टक्के आणि नंतर २७ टक्के वाढ करावी. उसाचे उत्पादनही चांगले आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती वाढली म्हणून साखर टंचाई होणार नाही. कारखान्यांना इथेनॉलचे पैसे लगेच मिळतात. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक तरलता वाढते. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ (अॅग्रोवन, १०.०४.२०२६)