anekant.news@gmail.com

9960806673

साखर उद्योगाला चालना मिळणार

डिझेलमध्ये बायो-आयसोब्युटेनॉल मिश्रणाचा पर्याय
पुणे ः पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणानंतर आता डिझेलसाठी बायो-आयसोब्युटेनॉलचा पर्याय पुढे येत आहे. साखर कारखान्यांमध्ये बायो-आयसोब्युटेनॉल उत्पादन करणे शक्य होणार आहे. सध्याच्या इथेनॉल उत्पादन प्रकल्पामध्ये बोल्ट ऑन मॉड्युल्स बसवून बायो-आयसोब्युटेनॉलचे उत्पादन करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे साखर उद्योगाला मोठी चालना मिळू शकते. आता बायो-आयसोब्युटेनॉलबाबत धोरण निश्चित होण्याची प्रतीक्षा आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यातील अनिश्चितता लक्षात घेता, बायो-आयसोब्युटेनॉलचे डिझेलमध्ये मिश्रण उपयोगी ठरू शकते. याशिवाय केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनीही बायो आयसोब्युटेनॉलच्या डिझेलमध्ये मिश्रणाबद्दल विविध कार्यक्रमकात भाष्य केले आहे. देशातील एकूण इंधन वापरात डिझेलचा सुमारे ४० टक्के वाटा आहे. रेल्वे, राज्य परिवहन महामंडळे, मालवाहतूक करणारे ट्रक तसेच शेतातील ट्रॅक्टर यासह इतर घटक डिझेलवर असवलंबून आहेत.
पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण यशस्वी झाले असले तरी, डिझेलसाठी ते तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. बायो आयसोब्युटेनॉल हे पाणी न शोषणारे (हायड्रोफोबिक) असल्याने ते डिझेलमध्ये सहज मिसळते आणि इंजिनवर कोणताही विपरीत परिणाम होत नसल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही - बायो आयसोब्युटेनॉलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते ड्रॉप-इन फ्युएल आहे. म्हणजेच इंधन वापरण्यासाठी वाहनांच्या इंजिनमध्ये, इंधन पंपामध्ये किंवा साठवणूक यंत्रणेत कोणताही बदल करण्याची आवश्यकता नाही.
असे आहेत फायदे
* डिझेलमध्ये थेट मिश्रण, इंजिनमध्ये कोणतही बदल आवश्यक नाही.
* ऊर्जा घनता जास्त, मायलेज व कार्यक्षमतेत तडजोड नाही
* पर्यावरणपूरक व कार्बन न्यूट्रल इंधन
* साखर व धान्य उद्योगांना नवी बाजारपेठ
* ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना
प्राज इंडस्ट्रीजने तंत्रज्ञान विकसित केले असून, आता व्यावसायिक उत्पादनासाठी तयार आहे. त्यासाठी सरकरच्या धोरणाची अपेक्षा आहे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलमध्ये बायो आयसोब्युटेनॉल मिश्रणाचे धोरण जाहीर होणे आवश्यक आहे. तसेच उत्पादकांना परवडेल अशी खरेदी किंमत निश्चित केल्यास येत्या ३-४ वर्षात या इंधनाचा वापर सुरू होण्याची शक्यता आहे. दिलीप पाटील, सहअध्यक्ष, शुगर बायोएनर्जी फोरम (सकाळ, ०५.०४.२०२६)