anekant.news@gmail.com

9960806673

साखर कारखान्यांच्या वजन काट्यांच्या संयुक्त तपासणीला मिळेना मुहूर्त

पथकामध्ये तज्ज्ञ आयटी इंजिनिअर यांची उणीव
कोल्हापूर ः कारखान्यांकडून होणारी काटामार रोखण्यासाठी साखर उपसंचालक कार्यालयाकडून भरारी पथके स्थापन करण्यात आली असली तरी पथकामध्ये तज्ज्ञ आयटी इंजिनिअर न मिळाल्यामुळे साखर कारखान्यांचे वजन काटे तपासणीला हंगाम सुरू होऊन महिना झाला तरी मुहूर्त लागेना, यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
साखर कारखानदारांकडून होणारी काटामारी हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा चर्चेचा आणि नाराजीचा विषय आहे. साखर कारखानदार वजनामध्ये बदल करून शेतकर्‍यांचे आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून कायम करण्यात येत असतो. कारखानदारांच्या या काटामारीसंदर्भात सरकार स्तरावर देखील वारंवार चर्चा होत असल्या, तरी सरकारमधील प्रतिनिधीच साखर कारखान्यांचे चेअरमन असल्यामुळे त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याचे बोलले जाते. त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकर्‍यांना बसत असतो.
पूर्वी साधे वजन काटे होते. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे वजन काट्यांमध्ये मोठे तांत्रिक बदल झाले आहेत. वजन काट्यातील नवीन तंत्रज्ञान, त्यातील बारकावे त्यातील तंज्ज्ञांनाच समजणार. अधिकार्‍यांना किंवा कर्मचार्‍यांना ते समजू शकत नाहीत. अनेक कारखान्यांमध्ये डिजिटल सिस्टीम, सॉफ्टवेअर आधारित वजन काटा, नेटवर्कद्वारे डेटा ट्रान्स्फर तसेच रिमोट मॉडिफिकेशनची शक्यता असल्याने तज्ज्ञ तपासणीची गरज अधिक भासू लागली आहे.
यासंदर्भात साखर उपसंचालक कार्यालयाने साखर आयुक्तांना प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. मात्र अद्याप आयटीतज्ज्ञ उपलब्ध न झाल्याने भरारी पथकांची संयुक्त तपासणी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, कारखान्यांच्या वजन काट्यांंच्या तपासणीला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल शेतकरी वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. (सकाळ, ०४.१२.२०२५)