राज्यात 10 लाख मजुरांसह वाहतूक कामगार, मुकादमांना मिळणार लाभ
म्हाकवे ः राज्यात 127 सहकारी व 129 खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये सुमारे 10 लाख ऊसतोड मजूर काम करतात. ऊसतोडणी व वाहतूक करताना घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न बंद होऊन अडचणींची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सरकारकडून ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार, मुकादम व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजना राबविण्यात येत आहे.
ही योजना ऊस गाळप हंगामाच्या कालावधीसाठी लागू असून, या कालावधीत ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार, मुकादम यांना किंवा त्यांच्या बैलांना केव्हाही अपघातामुळे मृत्यू अथवा अपंगत्व आले तरी या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मात्र, शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यवाहीत असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधित लाभार्थी या योजनेंतर्गत मिळणार्या लाभास पात्र असणार नाही. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या सर्व ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार व मुकादम यांच्या झोपडी व बैलजोडी यांच्यासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह योजना राबविण्यात येत आहे.
योजनेतील लाभार्थी तसेच बैलजोडी यांचे नोंदणीकरण डिजिटल रेकॉर्ड गोपीनाथ मुंंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे केले असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ऊसतोड मजूर, वाहतूक कामगार व मुकादम तसेच त्यांची बैलजोडी यांच्या अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल, तेव्हा संबंधित अपघातग्रस्त ऊसतोड, वाहतूक कामगार, मुकादम यांच्या वारसदारांनी सर्व निर्धारितम कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे 30 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
योजनेत या अपघातांचा समावेश - योजनेंतर्गत पात्रतेसाठी रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशक हाताळताना अथवा अन्य कारणान विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदाष, जनावरांच्या हल्ल्यामुळे चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल तसेच अन्य कोणताही अपघात या अपघातांचा समावेश असणार आहे.
दुर्घटनानिहाय आर्थिक मदत - या योजनेंतर्गत झोपडीला आग (10 हजार रूपये), वैयक्ति अपघात मृत्यू (5 लाख), वैयक्तिक अपघात अपंगत्व (अडीच लाख), वैयक्तिक अपघात वैद्यकीय खर्च (50 हजार), लहान बैलजोडी मृत्यू वा अपंगत्व (75 हजार), मोठी बौलजोडी मृत्यू व अपंगत्व (1 लाख रूपये) अशी मदत मिळणार आहे. (सकाळ, 18.12.2024)