पी.एम. पाटील गटाला मिळाला मोठा दिलासा
कबनूर ः पंचगंगा साखर कारखान्याची जानेवारीत झालेली बिनविरोध निवडणूक उच्च न्यायालयाने वैध असल्याचा निकाल गुरूवार दि. ६ ऑक्टोबर रोजी दिल्याची माहिती संचालक प्रमोद पाटील यांनी दिली. या निकालाने पी.एम. पाटील गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.
संचालकपदासाठी डिसेंबर २०२४ मध्ये निवडणूक लागली होती. अर्ज माघारीनंतर पी.एम. पाटील पॅनेलचे १७ संचालकांचें अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी त्यास मान्यतेसाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे ही नावे पाठविली होती. तथापि काहींनी याविरोधात तक्रारी दाखल केल्याने प्राधिकरणाने ही निवडणूक रद्द ठरवली व फेरनिवडणूक जाहीर केली.
काही सभासदांनी उच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करून फेरनिवडणुकीस स्थगिती आणली. तसेच बिनविरोध झालेली निवडणूक बरोबर असल्याने त्यास माान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिकेंवर न्या. चपळगावकर यांच्यापुढे झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचे म्हणणे ऐकून निकाल दिला.
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचाराने आम्ही चालवित असलेला कारखाना कर्जमुक्त होऊन प्रगतीपथावर असताना विरोधकांनी पराभवाच्या मानसिकतेतून सभासदांची दिशाभूल करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला. अखेर त्यांना न्यायदेवतेनेच चपराक दिली. - पी.एम. पाटील, अध्यक्ष (लोकमत, ०७.११.२०२५)