राष्ट्रीय सहकारी साखर काखाना महासंघाची केंद्र सरकारकडे मागणी
नवी दिल्ली ः साखरेच्या दरात आणखी घसरण होऊ नये, यासाठी साखर निर्यातीचा कोटा वाढवावा आणि अतिरिक्त ५ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवावी, अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे केली आहे. चालू हंगामात साखर उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी साखर कारखाना महासंघाने देशांतर्गत साखरेचा दर स्थिर ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी विनंतीही केली आहे.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी म्हटले आहे की, सरकारने वेळेवर आणि सकारात्मक निर्णय घेतल्यास साखर कारखान्यांना, विशेषतः आर्थिक बोजा वाढत असलेल्या कारखान्यांना मोठा दिलासा मिळेल. साखरेची जास्त निर्यात आणि साखर अधिक प्रमाणात इथेनॉलकडे वळविल्यास बाजारातील अतिरिक्त साखरेचा साठा खपण्यास मदत होईल. तसेच तिला किमान विक्री दरही मिळेल.
इंडियन शुगर अॅण्ड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माहितीनुसार २०२५-२६ हंगामात साखर उत्पादनाबाबत मजबूत आणि आशादायी कल दिसून येत आहे. प्रमुख ऊस उत्पादक राज्यात ऊस मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे आणि कार्यक्षमतेत झालेली सुधारणा ही यामागील कारणे आहेत. या वाढीतून क्षेत्राची उत्पादन क्षमता अधोरेखित होताना साखरेच्या अतिरिक्त साठ्यामुळे दरावर परिणाम होईल, अशी चिंता साखर कारखानदारांनी व्यक्त केली आहे. (अॅग्रोवन, २०.१२.२०२५)