anekant.news@gmail.com

9960806673

संजीवनी साखर कारखाना मोडीत

नव्या प्रक ल्पाचा प्रस्तााव ः सरकारकडून पीपीपी मॉडेलवर भर
पणजी ः गेली ६ वर्षे बंद असलेला धारबांदोडा येथील संजीवनी सहकारी साखर कारखाना पूर्णपणे मोडीत काढण्याच्या तयारीत सरकार आहे. त्याच ठिकाणी सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर अत्याधुनिक तंत्रज्ञानासह नवा साखर कारखाना उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान कारखान्याची यंत्रसामग्री अत्यंत जुनाट झाली असून वारंवार दुरूस्ती करून तो चालवला जात होता. मात्र, गेल्या ६ वर्षांपासून कारखाना पूर्णपणे बंद असल्याने तो पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नव्या गुंतवणुकीने आधुनिक कारखाना उभारण्याचा निर्णय घेण्यात येत असून, लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत.
हा कारखाना राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आला होता. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आपला ऊस राज्याबाहेर पाठवावा लागू नये, या उद्देशाने तोट्याची पर्वा न करता हा प्रकल्प चालवण्यात आला. मात्र, २०१९-२० च्या गळीत हंगामानंतर तो पुन्हा सुरू करण्यत आलेला नाही.
कारखाना पुनरूज्जीवित करण्यासाठी यापूर्वी दोनदा पीपीपी मॉडेलवर प्रस्ताव मागवले गेले होते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ते प्रयत्न अपयशी ठरले. त्यामुळे आता पूर्णपणे नवा प्रकल्प उभारण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. नव्या प्रस्तावानुसार दररोज ३५०० टन ऊस गाळप क्षमता असलेला काारखाना उभारण्यात येणार आहे. सोबतचा दररोज ७५ किलोलीटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यात येईल.
गुंतवणूकदारांसाठी टप्प्याटप्प्याने अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात १२५० टन गाळप क्षमता आणि ३० किलोलीटर इथेनॉल उत्पादन सुरू करणे बंधनकारक असेल. त्यानंतर ७ वर्षांनी दुसर्‍या टप्प्यात पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करावे लागेल.
धारबांदोडा येथे सुमारे २.४ लाख चौरस मीटर जमीन हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्या राज्यात सुमारे ५५० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड होत आहे. वार्षिक सुमारे ६९ हजार टन उत्पादन घेतले जाते. नव्या कारखान्यांंमुळे ऊस उत्पादकांना स्थानिक पातळीवर मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
जुना कारखाना का बंद केला जातोय - जुनाट यंत्रसामग्री, वाढता दुरूस्ती खर्च आणि गेल्या ६ वर्षांपासून बंद स्थिती यामुळे संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करणे अशक्य झाले आहे.
नव्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये - नव्या कारखान्याची दररोज ३५०० टन गाळप क्षमता असेल. ७५ किलोलीटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पही उभारण्यात येणार आहे.
ऊस उत्पादकांना मोठा दिलासा - राज्यातील ५५० हेक्टरवरील ऊस उत्पादकांना स्थानिक स्तरावरच प्रक्रिया सुविधा मिळणार असल्याने वाहतूक खर्च व वेळ वाचणार आहे. (गोमन्तक्र ०५.०४.२०२६)