मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड तसेच खानदेशातील जळगाव व नंदुरबारमधील ऊस गाळपाचा परवाना मिळालेल्या १८ पैकी ९ कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली आहे.प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार, रविवापर्यंत (ता. २४) या नऊ कारखान्यांनी दोन लाख ७२ हजार ९११ टन उसाचे गाळप करत एक लाख ६५ हजार २२६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
या सर्व कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ६.०५ टक्के इतका राहिला. यंदाच्या ऊस गाळपासाठी खानदेश व मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी तयारी दर्शवली होती. त्यापैकी १८ कारखान्यांच्या गाळपाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली मान्यता मिळालेल्या १८ पैकी नऊ कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळपाला आतापर्यंत सुरुवात केली. त्यामध्ये सहकारी ३ व खासगी ६ कारखान्यांचा समावेश आहे.
साखर विभागाच्या माहितीनुसार, तीन सहकारी साखर कारखान्यांनी ५२ हजार ९०६ टन उसाचे गाळप करत ३४ हजार ९९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. त्यांचा साखर उतारा ६.६१ टक्के राहिला. खासगी कारखान्यांनी २ लाख २० हजार ५ टन उसाचे गाळप करत १ लाख ३० हजार २३१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले त्यांचा सरासरी साखर उतारा ५.९२ टक्के राहिला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन कारखान्यांचा ऊस गाळप परवाना अजून बाकी आहे. त्यामध्ये शरद एसएसके, सचिन घायाळ शुगर आणि घृष्णेश्वर शुगर या कारखान्यांचा गाळप परवाना मिळणे बाकी असल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.
जिल्हानिहाय ऊस गाळप स्थिती
बीड : जिल्ह्यातील दोन सहकारी व दोन खासगी मिळून चार कारखान्यांनी प्रत्यक्ष उस गाळपाला सुरुवात केली. या चार कारखान्यांनी १ लाख ५५ हजार २३१ टन उसाचे गाळप करत ८४ हजार ६४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ५.४५ टक्के इतका राहिला.
जालना : जिल्ह्यातील केवळ खासगी श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्रा प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या परतूर तालुक्यातील वरफळ येथील कारखान्याने ऊस गाळपाला सुरुवात केली. या कारखान्याने २६,६४५ टन उसाचे गाळप करत सरासरी ६.१ टक्के साखर उताऱ्याने १६ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तीन खासगी कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरुवात केली. या कारखान्यांनी ८३ हजार १२० टन उसाचे गाळप करत ६२ हजार २८१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.४९ टक्के राहिला.
जळगाव: जिल्ह्यातील बारामती ॲग्रो लिमिटेड ने भाडेतत्त्वावर घेतलेल्या चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड चाहर्डी (ता. चोपडा) या कारखान्याने १६ नोव्हेंबरपासून गाळपाला सुरुवात केली. ७ हजार ९१६ टन उसाचे गाळप करत २ हजदार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्याचा सरासरी साखर उतारा ६.९७ टक्के राहिला.