सातारा : यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, तात्यासाहेब कोरे, रत्नाप्पा कुंभार, नागनाथ नायकवडी यांच्या सहकारातील योगदानामुळे पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी चांगलीच रुजली. या कारखानदारीच्या निमित्ताने अनेकांना रोजगार देत आहेत.
शेतकऱ्यांना उसासारखे पीक घेऊन चार पैसे हातात पडू लागले. साहजिकच हाच शेतकरी त्या कारखान्याशी आणि पर्यायाने कारखान्याच्या संस्थापकाशी जोडला गेला. निवडणुकीत हेच कारखानदार उभे राहिल्याने शेतकरी मतदार झाला आणि कारखानदार नेते झाले. पश्चिम महाराष्ट्रात सध्याच्या निवडणुकीत असे जवळपास २५ हून अधिक कारखानदार निवडणूक रिंगणात आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात साखर कारखानदारी आणि सूत गिरण्या हे सहकारातील उद्योग चांगले रुजले आहेत. या उद्योगांच्या निमित्ताने गावातील अनेक तरुणांना रोजगार देता आला. त्यांचे संसार उभे राहिले आहेत. त्यामुळे हे लोक साखर आणि सूत गिरणी कारखानदारांशी जोडले गेले आहेत. यांच्या मदतीनेच अनेकांना विधानसभा निवडणुकीत आपला विजय सोपा करणे शक्य होते.
सातारा - बाळासाहेब पाटील, अतुल भोसले, मनोज घोरपडे, प्रभाकर घार्गे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील या उमेदवारांच्या ताब्यात साखर कारखाने आहेत. कोणी या कारखान्यांचे चेअरमन आहे तर कोणी संचालक.
सांगली- मानसिंगराव नाईक, पलूस कडेगाव संग्रामसिंह देशमुख, विश्वजीत कदम, तासगाव कवठेमहांकाळ संजयकाका पाटील, जयंत पाटील तर सहा उमेदवार हे बँका आणि कारखान्याचे संचालक आहेत.
कोल्हापूर - के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, राहुल पाटील, राजू आवळे, अमल महाडीक, हसन मुश्रीफ, समरजीत घाटगे, विनय कोरे, राहुल आवाडे, गणपतराव पाटील, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, नंदिनी बाभूळगावकर हे उमेदवार सहकारी कारखानदारी आणि सूत गिरण्यांशी संबंधित आहेत.