सातारा ः येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून गुरूवार दि. २७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरूवात होणार आहे. ही प्रक्रिया ५ मार्चपर्यत सुरू राहणार आहे. या निवडणुकीसाठी ५ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार असून निवडणुकीचा निकाल दि. ६ एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती सह्याद्री साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सद्रिक यांनी दिली.
या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि. २७ फेब्रुवारी ते ५ मार्च ही मुदत असून निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या उमेदवार अर्जाची छाननी दि. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे.
वैध उमेदवाांची नावे दि. ७ मार्च रोजी निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयात प्रसिद्ध केली जातील. दि. ७ ते २१ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. पात्र उमेदवारांना दि. २४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता निशाणी वाटप करण्यात येणार असून त्यांची अधिकृत यादीही यावेळी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या निवडणुकीसाठी ५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडुकीसाठी व्यक्त उत्पादक सभासद मतदार संघातून एकूण १६ संचालक निवडले जाणार असून कराड गटातून २, तळबीड गटातून २, उंब्रज गटातून ३, कोपर्डे हवेली गटातून ३, वाठार किरोली गटातून ३, मसूर गटातून ३ संचालकांचा समावेश आहे. अनुसूचित जाती, जमातीमधून १, महिला राखीवमधून २, इतर मागास प्रवर्गातून १ आणि भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातूुन १ असे एकूण २१ संचालक निवडले जाणार आहेत. (पुढारी, २७.०२.२०२५)