खानदेशात उसाखालील क्षेत्र स्थिर आहे. परंतु यंदा ऊस तोडणी निवडणुकीच्या धामधुमीत लांबली आहे. आता पुढील महिन्यात ऊस तोडणी सुरू होईल, अशी स्थिती असून, तोडणीची तयारी पूर्ण झाल्याचे दिसत आहे.नंदुरबार जिल्ह्यात उसाची १४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. खानदेशात ऑक्टोबरच्या अखेरीस साखर कारखाने सुरू होतील, असे संकेत होते.
परंतु दिवाळी व लागलीच विधानसभा निवडणूक अशी लगबग सुरू झाली.यात गाळप हंगाम लांबला. पण कारखाने डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होणार आहेत. यामुळे गाळपासंबंधी कार्यवाही गती घेईल. तसेच गाळप सर्व क्षेत्रांतील उसाचे होईल, असे दिसत आहे. मागील हंगामातही गाळप वेगात झाले होते.
मध्यंतरी खानदेशातील ऊस लागवड १५ हजार हेक्टरवर खाली आली होती. परंतु मागील तीन वर्षांत उसाखालील क्षेत्रात वाढ झाली. जळगाव जिल्ह्यात मागील हंगामातही १२ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. यंदाही १२ हजार हेक्टरवर जळगावात ऊस आहे. धुळे जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर ऊस आहे. यात साक्री व शिरपूर तालुक्यांत ऊसलागवड अधिक आहे. नंदुरबारमध्ये १४ हजार हेक्टरवर ऊस असून, शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यांत ऊस पीक अधिक आहे.
नंदुरबार जिल्ह्यात तीन साखर कारखाने सुरू होणार आहेत. यातील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील कारखाना गाळपात आघाडी घेतो. या कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप मागील हंगामात केले आहे. जळगाव जिल्ह्यात दोन साखर कारखाने सुरू होणार आहेत. त्यात घोडसगाव (ता. मुक्ताईनगर), चहार्डी (ता. चोपडा) हे कारखाने सुरू होणार आहेत.
नंदुरबारमध्ये डोकारे (ता. नवापूर), समशेरपूर (ता. नंदुरबार), पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) हे कारखाने सुरू होणार आहेत. तसेच तळोदा तालुक्यात एक खांडसरी सुरू होईल. पुढेही खानदेशात १०० टक्के उसाचे गाळप होईल, असे चित्र आहे. यामुळे ऊस लागवड स्थिर आहे. काही भागांत ऊसलागवड कमी झाली आहे.