anekant.news@gmail.com

9960806673

राज्यातील साखर कामगार 16 डिसेंबरपासून संपावर जाणार


राज्य सरकारने साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांचे वेतन व सेवा शर्ती ठरविण्याबाबत त्वरित त्रिपक्ष कमिटी गठित करावी, साखर कामगारांचे थकीत वेतन मिळण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी साखर कामगारांनी 16 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिलेला आहे.


साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची गुरुवारी (दि. 28) पुण्यात बैठक झाली. या बैठकीला अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांच्यासह सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, राज्य साखर कामगार महासंघाचे अध्यक्ष कॉम्रेड पी. के. मुंडे, आनंदराव वायकर आदींसह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कळविली आहे.


महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ ही साखर उद्योगातील नोंदणीकृत व मान्यताप्राप्त मंडळ आहे. राज्यातील साखर उद्योग व जोडधंद्यातील सर्व कामगारांच्या पगारवाढीच्या कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे.तत्पूर्वी पगारवाढीच्या मागण्यांबाबतच्या बदलाची नोटीस मंडळाने 10 फेब्रुवारी 2024 रोजी दिलेली आहे. याशिवाय मुख्यमंत्री, सहकारमंत्री, कामगारमंत्री, साखर आयुक्त, राज्य सहकारी साखर कारखाना संघ व अन्य यांनाही मागण्यांचा मसुदा 27 फेब्रुवारी रोजी पाठवूनही प्रतिसाद मिळालेला नाही.


भाडेतत्त्वावर व भागीदाराने व विक्री केलेल्या तसेच खासगी साखर कारखान्यातील कामगारांना त्रिपक्षीय समितीच्या कराराप्रमाणे वेतन मिळाले पाहिजे व त्यांच्या थकीत पगाराची रक्कम अग्रक्रमाने मिळाली पाहिजे. याबाबत स्थानिक संघटनांची मान्यता घेऊनच करार करावा. तसेच, शेती महामंडळातील कामगारांचे प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करावी, अशाही मागण्या मंडळाचे अध्यक्ष काळे व सरचिटणीस शंकरराव भोसले यांनी शासनाकडे केलेली आहे.