204 साखर कारखान्यांनी दिली 100 टक्के रक्कम
पुणे ः राज्यातील गतवर्षी 2023-24 मधील गाळप झालेल्या उसाची एफआरपी ऊसतोडणी वाहतूक खर्चासह शेतकर्यांच्या बँक खात्यावर 36 हजार 754 कोटी रूपये (99.99 टक्के) साखर कारखान्यांनी जमा केले आहेत. चार कारखान्यांकडे मिळून केवळ 4 कोटी रूपयांइतकी एफआरपी थकीत राहिली आहे. त्यामुळे यंदाचा गाळप हंगाम सुरू होताना देय रक्कम शून्यावर येण्याची अपेक्षा असून, थकीत एफआरपीचा अडथळा अखेर दूर झाला आहे.
राज्यात गतवर्षी 208 साखर कारखाने मिळून 10 कोटी 76 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले. त्यापोेटी ऊसतोडणी वाहतूक खर्चासह देय रक्कम 36 हजार 758 कोटी होती. प्रत्यक्षात कारखान्यांनी त्यापेक्षा अधिक म्हणजे 40 हजार 192 कोटी रूपये ऊसतोडणी वाहतूक खर्चास दिलेले आहेत. त्यामध्ये 204 साखर कारखान्यांनी एफआरपीची 100 टक्के रक्कम दिलेली आहे.
त्यामुळे चालू वर्षी 2024-25 मध्ये उसची एफआरपी थकीत असल्याप्रकरणी ऊस गाळप परवाना नाही, अशी स्थिती बहुतांशी राहणार नाही. कारण चार कारखान्यांकडूनही देय असणारी चार कोटींची रक्कम हंगाम सुरू होण्यापूर्वी दिली जाणे अपेक्षित आहे. ज्यामुळे 100 टक्के एफआरपीची रक्कम नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांकडून दिली जाणे ही सुद्धा साखर उद्योगासाठी जमेची बाजू मानली जात आहे. (पुढारी, 12.11.2024)