anekant.news@gmail.com

9960806673

देशभरात तब्बल 2300 कोटींचे मोलॅसिस, इथेनॉल शिल्लक

बी हेवीचे निर्बंध हटवले ः हंगामात 25 लाख टन साखर उत्पादन वाढले

कोल्हापूर ः देशातील साखरेच्या उत्पादनाचा अंदाज आल्याने बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली खरी, पण बंदी असतानाही ज्यांनी तयार करून ठेवले त्यांनाच फायदा होणार आहे. राज्यात 1100 कोटी तर देशात 2300 कोटींचे मोलॅसिस व इथेनॉल शिल्लक आहे. तेल कंपन्यांनी सुमारे 67 कोटी लिटर खरेदीची निविदा काढली असली तरी कोटा वाढविण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे.

डिसेंबर 2023 मध्ये केंद्र शासनाने घेतलेल्या आढाव्यामध्ये देशातील साखरेची उपलब्धता कमी राहण्याचा आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात वाढीच्या भीतीपोटी केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 रोजी उसाचा रस, साखरेचा अर्क तसेच बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस बंदी आणली.

कारखान्यांमध्ये तयार असलेले इथेनॉल, इथेनॉलसाठी लागणारे बी हेवी मळीचे साठे तसेच तेल कंपन्यांशी केलेले करार या सगळ्यांवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले. केंद्र सरकारने 15 डिसेंबर 2023 रोजी सुधारित आदेश काढून शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी यांची इथेनॉल वापरासाठी परवानगी देऊन कारखान्यांना अंशतः दिलासा दिला. जास्तीत जास्त 17 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याची परवानगी देण्यात दिली.

हंगामात अपेक्षेपेक्षा 20 ते 25 लाख टनाने साखर उत्पादन वाढल्याने शिल्लक राहिलेल्या सुमारे 7 लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेेनॉल निर्मितीसाठी करण्याची मागणी राष्ट्रीय साखर महासंघाने केंद्र सरकारकडे केली. त्यानंतर 24 एप्रिल रोेजी कें द्र शासनाकडून सुमारे 7 लाख टन शिल्लक बी हेवी मळीचा वापर इथेनॉलकडे करण्याची परवानगी दिली. यामधून सुमारे 3.25 लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळवल्याने त्यातून 38 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होईल. ज्याची किंमत 2300 कोटी आहे. त्यामुळे साखरेचे साठे कमी होण्यात मदत होणार आहे. (लोकमत, 21.05.2024)