anekant.news@gmail.com

9960806673

पुढील हंगामातही साखर निर्यातीची शक्यता धूसर

कोल्हापूर ः येणार्‍या हंगामातीही साखर निर्यातीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात येत असला तरी यंदाच्या साखरेचे उत्पादन निर्यातीला परवानगी देण्याइतपत झाले नसल्याने केंद्राने यंदाच्या हंगामातील निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय तूर्त तरी लांबणीवर टाकला आहे. देशातील कारखाने आणखी दोन महिने चालण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र मात्र अद्याप निर्यातबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता नसल्याचे अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या देशात गेल्यावर्षीपेक्षा साखरेचे उत्पादन कमी होत असले तरी गेल्या वर्षीच्या व यंदाच्या उत्पादनाच्या आकड्यांमध्ये केवळ 10 लाख टनांपर्यंतचा फरक आहे. महाराष्ट्र व कर्नाटकातून यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन कमी होईल असा अंदाज आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण हंगामाच्या मध्यानंतर महाराष्ट्रासारख्या देशात अग्रेसर असणार्‍या राज्यामध्ये साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाले नाही. यामुळे यंदा साखरेची मोठ्या प्रमाणात चणचण निर्माण होईल हा अंदाज खोटा ठरला.

हंगाम संपेपर्यंत गेल्या वर्षीच्या जवळपास यंदाचेही साखर उत्पादन असेल असा साखर उद्योगाचा अंदाज आहे. यामुळे पुढील हंगामाच्या सुरूवातीला पुरेशा प्रमाणात साखर भारतीय बाजारपेठेसाठी उपलब्ध होईल, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले. पुरेशी साखर शिल्लक राहण्याची शक्यता असल्याने केंद्र पुढील वर्षी तरी निर्यातीला सुरूवातीच्या टप्प्यात परवानगी देईल, अशी शक्यता वर्तवण् यात येत होती.

परंतु सध्या तरी निर्यातीला परवानगी देण्याबाबत केंद्राकडून कोणत्याच हालचाली नसल्याचे सार्वजनिक अन्न व वितरण विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अजूनही यंदा साखर उत्पादन कमी होईल याच निर्णयावर आम्ही ठाम असून हंगाम संपल्यानंतरच पुढील हंगामाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाईज, असे सूत्रानी सांगितले.

निर्यातीला परवानगी नाही तसेच स्थानिक बाजारातही साखरेला मागणी कमी असल्याने विशेष करून महाराष्ट्र राज्यातील कारखाने अपेक्षित साखर विक्रीसाठी झगडत आहेत. सध्या स्थानिक बाजारात साखरेला मागणी नसल्याने केंद्राने हंगामाच्या शेवटी तरी काही प्रमाणात साखर निर्यातीस परवानगी द्यावी, अशी अपेक्षा साखर उद्योगाची होती. पण केंद्रीय स्तरावरून मात्र याबाबत हालचाली नसल्याचे स्पष्ट झाले. केंद्र पातळीवरून स्थानिक बाजारात साखरेचे दर स्थिर राहण्यासाठीच प्रयत्न होत आहेत. (अ‍ॅग्रोवन, 12.03.2024)