anekant.news@gmail.com

9960806673

पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर 15 टक्क्यांपर्यंत

टाकीत पाणी जाऊ नये याची काळजी घेण्याचे आवाहन
सांगली ः पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण तेल कंपन्यांनी 15 टक्क्यांपर्यंत नेले आहे. याची माहिती ग्राहकांना नसल्याने पेट्रोलपंप चालकांची डोकेदुखी वाढली आहे. पहिल्या काही टप्प्यात पेट्रोलमध्ये 5, 10 आणि 12 टक्के इथेनॉल मिसळण्यात येत होते. गेल्या काही महिन्यांपासून हे प्रमाण 15 टक्के केले आहे. अर्थात, त्याचा फायदा पेट्रोलची बचत, गाडीचे अ‍ॅव्हरे वाढणे यामध्ये होते.

पण इथेनॉलचा पाण्याशी संपर्क आल्यास ते पेट्रोलपासून वेगळे होते. त्याची छोटीशी गाठ बनते. ती पेट्रोल टाकीच्या तळाला जाऊन बसते. कधीकधी पेट्रोलच्या पाइपमध्ये अडकून गाडी बंद पडते. काही वर्षांपूर्वी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळणे सुरू केेले, तेव्हा ग्राहकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. पंपचालक पेट्रोलमध्ये भेसळ करीत असल्याचे आरोप झाले होते. पंपचालकांनी पंपावर इथेनॉल मिश्रणाची माहिती देणारे फलक लावले होते. पेट्रोलच्या टाकीत पाणी जाऊ नये याची काळजी घेण्यास सांगितले होते. आता पुन्हा तक्रारी वाढल्या आहेत.

जुन्या मॉडेलच्या तथा बीएस 6 पूर्वीचे वाहने इथेनॉलपूरक नाहीत. त्या वाहनांमध्ये इथेनॉलमिश्रीत पेट्रोल वापरल्यास तक्रारी येतात. सध्या येत असलेल्या तक्रारी याच ग्राहकांच्या आहेत. बीएस 6 निकष पाळणार्‍या वाहनांबाबत मात्र तक्रारी नाहीत.

इथेनॉलचा फायदा काय - उसापासून तयार होणार्‍या इथेनॉलमध्ये ऑक्सिजन असतो. याच्या मिश्रणाने पेट्रोलचे पूर्ण ज्वलन होते. वाहनांचे अ‍ॅव्हरेज वाढून इंधनाची बचत होते. साखर कारखान्यात उपपदार्थनिर्मिती वाढल्याने उसाला भावही चांगला देणे शक्य होते.

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाहनचालकांसाठी तसेच तेल कंपन्याा व शेतकर्‍यांसाठीही फायद्याचे आहे. मात्र, वाहनचालकांनी काळजी घ्यायला हवी. गाडी धुताना किंवा पावसात थांबल्यास पेट्रोलच्या टाकीमध्ये पाणी जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. विशेषतः 2023 पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनांच्या मालकांनी अधिक काळजी घ्यावी. तेल कंपन्यांनीही इथेनॉल मिश्रणाची पुरेशी माहिती ग्राहकांना देणे आवश्यक आहे. - सुरेश पाटील, जिल्हाध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, सांगली (लोकमत , 24.05.2024)