प्रशिक्षण वर्गांना मिळतोय उत्तम प्रतिसाद, गाळप कालावधी १५० दिवसांच्या पुढे नेण्याचा निर्धार
पुणे ः साखर कारखान्यांचे गाळप दिवस १५० दिवसांच्या पुढे नेण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने केला आहे. त्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ऊस लागवडीसाठी संघाने राज्यस्तरीय मोहीम चालू केली आहे. साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील यांनी सांगितले की, राज्याचा गाळप हंगाम सरासरी अवघ्या ८३ दिवसांवर आला आहे. साखर उद्योगातील अर्थशास्त्रानुसार गाळप किमान १५० दिवसांपर्यंत हवेत. गाळप दिवस घटल्याने यंदा सर्व कारखान्यांचे ताळेबंद तोट्यात गेले आहेत.
दुसर्या बाजूला एफआरपी देण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. या दुष्टचक्रातून सोडविण्याची ताकद केवळ एआयमध्ये आहे. सध्याचे ऊस लागवड तंत्र जुनाट असल्याने उत्पादकता घटली आहे. त्यामुळे गाळपाचे दिवस पुन्हा किमान १६५ दिवसांच्या पुढे नेण्याचा संकल्प संघाने सोडला आहे. एआय तंत्र जलदपणे स्वीकारण्याचा आग्रह साखर संघाने कारखान्याकडे धरला आहे.
दरम्यान कारखान्यांना या तंत्राची ओळख होण्यासाठी प्रक्षेत्रावर जाऊन एआयची प्रत्यक्ष ओळख व माहिती दिली जात आहे. यासाठी अलीकडेच तीन दिवस मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. बारामती कृषी विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमधील ४२ साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक असे १४० प्रतिनिधी, तर प्रशासनातील २१५ कार्यकारी संचालकांसह अधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे ५३३ ऊस उत्पादक शेतकर्यांनाही या उपक्रमात सामील करून घेण्यात आले. (अॅग्रोवन, १२.०५.२०२५)