सांगली : जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी कारखान्यांनी मिळून 4 लाख 26 हजार 315 टन उसाचे गाळप करून आजअखेर 3 लाख 53 हजार 805 क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सरासरी साखर उतारा 8.3 टक्के राहिला.जिल्ह्यातील 19 पैकी 16 कारखान्यांनी उसाचे गाळप सुरू केले आहे. तासगाव कारखान्यास साखर आयुक्तालयाने गाळप परवाना नाकारला आहे, तर गेल्या काही हंगामापासून बंद असलेले माणगंगा आणि महांकाली हे कारखाने यावर्षीही बंदच राहिले आहेत.
मंत्री समितीने घेतलेल्या निर्णयानुसार 15 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात ऊस गाळपास सुरुवात झाली आहे. खरेतर 2024-25 चा गळीत हंगाम दरवर्षीप्रमाणे 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार होता. मात्र, विधानसभा निवडणुकीची ‘वेळ’ साधून की काय शासनाने 15 नोव्हेंबरनंतरच गळीत सुरू करण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले. परिणामी यंदा हंगाम तीन आठवडे विलंबाने सुरू झाला. यात ऊस तोडणी व वाहतूक मजुरांचे 15 दिवसांचे उत्पन्न बुडाले आहे. शेतकर्यांच्या ऊस तोडीस 20 दिवस विलंब झाला, शिवाय साखर कारखान्यातील सर्व कर्मचारी व यंत्रणा 20 दिवस बसून राहिली. याचा मोठा फटका बसला आहे.
उसात घट होण्याची भीतीचालू झालेल्या गळीत हंगामासाठी सांगली जिल्ह्यात जवळपास 1 लाख 37 हजार हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र पुराचा नदीकाठच्या ऊस शेतीला बसलेला फटका पाहता एकरी ऊस उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एकरी उत्पादनात किमान दहा टक्के घट होण्याचा धोका आहे. उपलब्ध ऊस क्षेत्र पाहता सरासरी हेक्टरी उतारा 87 टन गृहित धरल्यास तब्बल एक कोटी टनाहून अधिक उसाचे वेळेत गाळप करण्याचे आव्हान आहे. अतिवृष्टी आणि महापुराने उसाच्या वाढीवर परिणाम झाला. यामुळे उसाच्या उत्पादनात किमान 15 लाख टन घट होण्याची भीती आहे. 2024-2025 या हंगामासाठी 1 लाख 37 हजार हेक्टर क्षेत्र आहे. 2023-24 च्या हंगामात 1 लाख 45 हजार हेक्टरमधील ऊस उपलब्ध होता.
चालू हंगामात त्यामध्ये आठ हजार हेक्टरने घट झाली आहे.जिल्ह्यात सहकारी साखर कारखान्यांनी आजअखेर 3 लाख 21 टन उसाचे गाळप करून 2 लाख 74 हजार 735 क्विंटल साखर उत्पादन केले आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा 8.55 टक्के राहिला आहे. तर खासगी साखर कारखान्यांनी 1 लाख 4 हजार 860 टन उसाचे गाळप करताना 79 हजार 70 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांचा 7.54 टक्के सरासरी साखर उतारा राहिला आहे. जिल्ह्यात यावेळी जवळपास एक कोटी टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र हंगाम जवळपास तीन आठवडे विलंबाने सुरू झाल्याने तयार ऊस शेतात तोडीच्या प्रतीक्षेत आहे. सर्वच कारखान्यांनी ऊस तोडणीचा कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. मात्र अनेक शेतकर्यांनी उसाची कारखान्यांकडे नोंद केलेली नाही. अशा शेतकर्यांना तोडी मिळण्यास काहीशा अडचणी येणार आहेत.
मुळात यावेळी गळीत हंगाम उशिरा सुरू झाला.
यातून अनेक शेतकर्यांची आडसाली उसाची तोडणी लांबली. आडसाली उस वेळेत तुटला, तर त्याचा शेतकर्यांना आणि कारखान्यांनाही फायदा होतो. विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखाने वेळेत सुरू झाले नाहीत. आता विधानसभा निवडणुकीची धामधूम संपली. बहुतांश कारखान्यांनी गाळप सुरू केले. मात्र, आतापासूनच कारखान्यांनी ऊसतोडणीचे पारदर्शक वेळापत्रक आखून त्याची कडक अंमलबजावणी करून उसाची जलदगतीने तोड करण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.एक कोटी टन ऊस गाळपाचे आव्हानचालू गळीत हंगाम तीन आठवडे उशिरा सुरू झाला आहे.
या हंगामासाठी सांगली जिल्ह्यात जवळपास 1 लाख 37 हजार हेक्टर ऊस क्षेत्र उपलब्ध आहे. मात्र, यावेळी पुराचा नदीकाठच्या ऊस शेतीला बसलेला फटका पाहता एकरी किमान दहा टक्के उतारा घटीचा फटका बसण्याचा धोका आहे. उपलब्ध ऊस क्षेत्र पाहता, सरासरी हेक्टरी उतारा (87 टन प्रतिहेक्टर) विचारात घेता जिल्ह्यातील कारखान्यांसमोर तब्बल एक कोटी टनाहून अधिक टन उसाचे वेळेत गाळप करण्याचे आव्हान आहे. यावेळी पहिली उचलही ‘एफआरपी’इतकीच राहील, अशीच शक्यता वर्तविली जात आहे.