तेल मंत्रालयाच्या दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरीची शक्यता
कोल्हापूर ः इथेनॉल उत्पादकांसाठी लवकरच गूूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. तेल मंत्रालयाने यंदाच्या इथेनॉल वर्षासाठी इथेनॉलच्या किमती वाढविण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी कॅबिनेटकडे पाठविला आहे. लवकरच या बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इथेनॉलच्या किमतीत 4 ते 5 रूपयांनी वाढ होऊ शकते. अन्न मंत्रालय आणि तेल विपणन कंपन्या यांच्याशी चर्चा केल्यानंतर इथेनॉलच्या किमती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्न मंत्रालयानेे यापूर्वी इथेनॉल पुरवठा वर्षांसाठी इथेनॉलच्या किमती वाढविण्याची शिफारस केली होती. या प्रस्तावित वाढीचा उद्देश उत्पादक आणि डिस्टीलरीजना भारताच्या इथेनॉल मिश्रणाच्या उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. गेल्या वर्षी कमी साखर उत्पादनाने कारण देत केंद्राने इथेनॉल निर्मितीला ब्रेक लावला. यामुळे इथेनॉल निर्मिती रखडली. दरात ही समाधानकारक वाढ नसल्याने इथेनॉल उत्पादकाकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने किमती वाढविण्याबाबत केंद्राकडे आग्रह धरण्यात येत होता. याचा विचार करून किमती वाढविण्याबाबत हालचालींना वेग घेतला आहे.
इथेनॉलची उत्पादन क्षमता गरजेची - भारताला पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेेनॉलचे मिश्रण साध्य करण्यासाठी 1016 कोटी लिटर इथेेनॉलची आवश्यकता आहे. एकूण इथेनॉलची मागणी सुमारे 1350 कोटी लिटर आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी 80 टक्के प्रकल्पांची कार्यक्षमता गृहीत धरून 2025 पर्यंत 1700 कोटी इथेनॉल उत्पादन क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे.
अशी आहे यंदाची स्थिती
* यंदाच्या इथेनॉल वर्षासाठी 2024-25 तेल कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांकडून 970 कोटी लिटरची मागणी
* हंगामासाठी 916 कोटी लिटरची गरज
* इथेनॉलची गरजेपेक्षा 6 टक्के जादा मागणी
* 970 कोटींपैकी 391 कोटी लिटर इथेनॉलची मागणी उसावर आधारित
* धान्यापासून बनवलेल्या इथेनॉलची मागणी 579 कोटी लिटर (अॅग्रोवन, 13.11.2024)