सांगली :
साखरेला 4200 रुपयांचा हमीभाव मिळेल आणि एमएसपीबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटलांनी केला आहे. त्यांची नुकतीच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली.
लवकरच साखरेची एमएसपी म्हणजेच किमान विक्री किंमत 4 हजार 200 रुपये प्रतिक्विंटल होणार असून यासाठी हर्षवर्धन पाटलांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मागील काही वर्षापासून ऊसाची केवळ एफआरपीच वाढत असून त्या तुलनेत साखरेचे दर वाढत नाहीत. असे झाल्याने साखर कारखान्यांना मिळणारी तफावतीची रक्कम अत्यंत तुटपुंजी मिळाल्याने कारखानदारी अडचणीत येत आहे. त्यामुळे साखर उद्योग वाचवायचा असेलतर साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल 4 हजार 200 रुपये करावी,अशी मागणी 524सहकारी साखर कारखान्यांनी केली आहे.
पुढे हर्षवर्धन पाटील म्हणाले की, “सहकारी साखर कारखानदारीवर बरेच घटक अवलंबून असून रोजगारक्षम व्यवसाय ससून साखर उद्योग वाचवायचा असल्यास साखरेचे किमान मूल्य प्रति क्विंटल ४२०० रुपये करावे,अशी मागणी 524 सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय संघाने केली आहे. हा प्रस्ताव आता केंद्रिय मंत्रीमंडळासमोर आहे. लवकरच याला मंजुरी मिळेल”.