आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने मागील गाळप हंगाम सन २०२३-२४ मध्ये गाळप केलेल्या उसास अंतिम ऊस दर प्रतिटन ३२०० रुपये जाहीर केला होता. त्यातील उर्वरित रक्कम २५० रुपये प्रतिटनाप्रमाणे एकूण रक्कम २७ कोटी ७३ लाख सोमवारी (ता. ७) ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
भीमाशंकर कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण ११ लाख नऊ हजार ४६८ टन उसासाठी एफआरपी २७९० रुपये प्रतिटन असतानाही कारखान्याने २९५० रुपये प्रतिटनाप्रमाणे रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वीच अदा केली आहे.
अंतिम दर ३२०० रुपये प्रतिटन जाहीर केल्याप्रमाणे उर्वरित रक्कम २५० रुपये प्रतिटनाप्रमाणे होणारी रक्कम २७ कोटी ७३ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून व दीपावलीसाठी साखर वाटप सुरू करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे.
कारखान्याचे संस्थापक संचालक व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कारखान्याने एफआरपीपेक्षा जास्तीची रक्कम वेळेत दिलेली आहे. याशिवाय वाढीव रक्कम २५० रुपये अंतिम हप्त्याचे स्वरूपात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेली आहे.