अहमदनगर :
राहुरीच्या डॉ.तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी जिल्हा बँकेने चौथ्यांदा निविदा काढली. चौथ्यांदा काढलेल्या निविदेवर राज्यभर चर्चा झाल्यानंतर निविदा भरण्यास पाच दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत सोमवार (दि.15) रोजी संपली असून बीडच्या मोहटादेवी शुगरने अडीच कोटी रुपये अनामत रक्कम जिल्हा बँकेकडे भरत डॉ.तनपुरे साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी निविदा भरली असल्याची माहिती जिल्हा बँक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
जिल्हा बँकेने डॉ. तनपुरे साखर कारखाना भाडेतत्वार चालवण्यास देण्यासाठी चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबवल्यावर पुण्याच्या भुलेश्वर आणि अवनिष शुगर, तर बीडच्या मोहटादेवी शुगरसह आणखी एका संस्थेकडून निविदा नेण्यात आली. जिल्हा बँकेने आधी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार कारखान्यांसाठी निविदा प्रक्रिया राबवताना 6 ते 8 जुलैपर्यंत कारखान्यांचा मालमत्ता पाहणी कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र, निविदा घेऊन जाण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील काही साखर संस्थांकडून कारखान्यांबाबत बँकेकडे विचारणा वाढली. यामुळे बँकेने निविदा प्रक्रियेला पाच दिवसांची मुदतवाढ दिली होती. ही मुदत सोमवार (दि.15) रोजी संपली असून बीडच्या मोहटादेवी शुगरची निविदा आली असल्याची माहिती बँकेच्यावतीने देण्यात आली.
दरम्यान, काही वर्षापूर्वी जिल्हा बँकेने कारखान्यांला 90 कोटी 3 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. त्या कर्जावर आता 44 कोटी 93 लाख रुपयांचे व्याज झाले आहे. थकीज कर्जासह व्याजाच्या वसूलीसाठी हा कारखाना भाडेत्तत्वर देण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासनाने घेतला आहे.