anekant.news@gmail.com

9960806673

तनपुरे कारखान्याचे भवितव्य अधांतरी

जिल्हा बँकेकडून सरफेसी कायद्यान्वये कारवाईची शक्यता

राहुरी ः तनपुरे सहकारी साखर कारखाना मागील 10 पैकी 6 गाळप हंगाम बंद राहिला. अवघ्या 4 हंगामात कारखाना चालला. त्यातही गाळप क्षमतेपेक्षा कमी उसाचे गळीत झाले. परिणामी, कारखाना आर्थिक चक्रव्यूहात पुरता गुरफटला आहे. सध्या दोन हंगाम बंद असलेला कारखाना येत्या हंगामात सुरू होण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य अधांतरी लटकले आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी तनपुरे साखर कारखान्यावर सरफेसी कायद्यान्वये कारवाईचा बडगा उगारला. 10 वर्षांपूर्वी बँकेने कारखान्याची मालमत्ता जप्‍त केली. तेव्हापासून कारखान्याला घरघर लागली. 2014*-15, 2015-16, 2016-17 असे सलग तीन हंगाम कारखाना बंद पडला.

सन 2016 साली कारखान्याची निवडणूक झाली. डॉ. सुजय विखे यांच्या नेतृत्त्वाखाली संचालक मंडळ विजयी झाले. डॉ. विखे यांनी बँकेच्या कर्जाचे पुनर्गठण करून कारखाना चालविण्यासाठी ताब्यात घेतला. 2017-18 हंगाम उशिरा का होईना सुरू झाला. 2018-19 हंगामात कारखाना व्यवस्थित चालला. पुढच्या वर्षी दृष्ट लागली. ऊस टंचाईचे कारणाने 2019-20 हंगामात कारखाना बंद ठेवण्यात आला. त्यावेळी आसपासच्या कारखान्यांनी गाळप हंगाम यशसवी केला. 2021-24 हंगामात मशिनरीच्या बिघाडामुळे वारंवार व्यत्यय आला. त्याचे खापर कामगारांवर फुटले. नंतर संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत संपली. शासनाने एक वर्ष मुदतवाढ दिली तरी 2021-22 हंगाम बंद ठेवण्यात आला.

बँकेने पुन्हा कारखान्याचा ताबा घेतला. शासनातर्फे कारखान्यावर प्रशासक नियुक्ती झाली. त्यामुळे 2022-23 हंगामातही कारखाना बंद राहिला. बँकेतर्फे कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी तीनवेळा निविदा प्रक्रिया झाल्या. परंतु प्रत्येक वेळी एकच निविदा आली. कायद्यानुसार किमान तीन निविदा बंधनकारक आहेत. त्यामुळे तीनही निविदा प्रक्रिया फोल ठरल्या.

कारखान्यात कायम व मजुरी हजेरीवरील कामगार, छोटे मोठे व्यापरी, ऊसतोडणी मजूर असे हजारो प्रपंच अवलंबून आहेत. महावितरणचे वीजबिल थकबाकीमुळे कामगार वसातीतील वीजपुरवठा खंडित केला आहे. पाणीपट्टी थकल्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेतर्फे वारंवार पिण्याचा पाणीपुरवठा बंद केला जातो. शेकडो कामगार दोन वर्षांपासून बरोजगार आहेत. कारखाना सुरू व्हावा, अशी कामगार, सभासदांची अपेक्षा आहे. बँंकेतर्फे चौथ्यांदा निविदा प्रक्रिया होईल. परंतु, येत्या हंगामात कारखाना सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य अधांतरी आहे.

लोकसभेच्या आचारसंहितेमुळे बँकेतर्फे तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची चौथी निविदा प्रक्रिया केली नाही. चार जूननंतर निविदा प्रक्रियेच्या हालचाली सुरू होतील.पुन्हा एकच निविदा आल्यास बँकेचे संचालक मंडळ योग्य तो निर्णय घेेतील. - नंदकिशोर पाटील, प्राधिकृत अधिकारीा, एडीसीसी बँक, अहमदनगर (सकाळ, 28.05.2024)