anekant.news@gmail.com

9960806673

थोरात कारखान्याकडून ऊसवाढीसाठी विकास योजना

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कारखान्याने सभासदांसाठी कार्यक्षेत्रात २०२५-२६ चा गळीत हंगामात उसवाढीसाठी विविध विकास योजना राबवल्या जाणार आहेत. ऊस लागवड, खोडवा, निडवा पीक घेणाऱ्या ऊस उत्पादकांना योजनेचा लाभ मिळेल. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती चेअरमन बाबा ओहोळ यांनी दिली.

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झालेला आहे. काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमुळे निळवंडे कालव्यांचे पाणीही कार्यक्षेत्रातील बऱ्याच गावांमध्ये उपलब्ध झालेले आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नवीन ऊस लागवडीसाठी प्रतिएकरी ५५०० ऊस रोपे (४x२ फूट सरीमध्ये) प्रतिरोप रुपये १.७० पैसे या अनुदानित दराने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोच केले जाणार आहेत.

स्वतः ऊस रोपे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिएकरी १५० प्लॅस्टिक ट्रे व २० गोण कोकोपीट ५० टक्के अनुदानावर वसुलीच्या अटीवर दिले जाईल. सुपर केन नर्सरीद्वारे ऊस रोपे तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत मार्गदर्शन, एकरी रुपये १५ हजार रुपये अनुदान, जे शेतकरी प्रमाणित बेणेप्लॉटमधील बेणे ऊस लागवडीसाठी विकत घेऊन बापरतील त्यांना १० हजार प्रतिएकरी वसुलीच्या अटीवर,जे शेतकरी कारखान्याकडून ताग, धैंचा बियाणे घेऊन हिरवळीचे पीक घेतल्यानंतर त्या क्षेत्रात ऊसलागवड करतील त्यांना त्यांचा ऊस गळीतास आल्यानंतर निवळीचे खताचे बियाण्यांची ५० टक्के रक्कम अनुदान दिले जाईल. राजहंस सेंद्रिय खत, अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खते (प्रोम फर्टिलायझर) तसेच बायो फर्टिलायझर वापरणे गरजेचे आहेत.
२०२५-२६ गळिताच्या उसासाठी ऊस उत्पादकांना ५० टक्के अनुदानावर वसुलीच्या अटीवर प्रतिएकरी १ टन अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत देण्यात येते. कार्यक्षम पाणी वापर करून प्रतिहेक्टरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेण्यासाठी कारखान्याने ४००० मीटर नॉन आयएसआय पेप्सी लॅटरल ५० टक्के अनुदानावर वसुलीच्या अटीवर देण्याचे धोरण घेतलेले आहे. कारखान्याच्या शेतकी व ऊस विकास विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे, असे उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले.