anekant.news@gmail.com

9960806673

साखर उत्पादन ३३३ लाख टन होण्याचा ‘इस्मा’चा अंदाज

कोल्हापूर :

इंडियन शुगर मिल्स ॲण्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (इस्मा) यंदाच्या हंगामात (२०२४-२५) ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. ‘इस्मा’ने मंगळवारी (ता. ३०) देशभरातील साखर उत्पादक राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीत उपग्रह प्रतिमेचे सर्वसमावेशक विश्लेषण, अपेक्षित उत्पादनावरील क्षेत्रावरील अहवाल, मागील आणि चालू वर्षातील पावसाचा प्रभाव, जलाशयांमध्ये पाण्याची उपलब्धता याची माहिती घेऊन हा अंदाज व्यक्त केला.

गेल्या वर्षीपेक्षा तीन लाख हेक्टरने उसाचे क्षेत्र घटले आहे. गेल्या वर्षी ५९.४४ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होती. यंदा त्यात घट होऊन ५६.०४ लाख हेक्टर इतके क्षेत्र तोडणीसाठी उपलब्ध असणार आहे. गेल्‍या वर्षी पाऊस न झाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये उसाची लागवड घटली आहे.

या दोन्‍ही राज्‍यांत साखरेच्या उत्‍पादनात घट अपेक्षित आहे. ऊस उत्पादनात महाराष्‍ट्रात १३ तर कर्नाटकात ८ टक्के घटीची शक्यता आहे. साखर उत्पादनही अनुक्रमे ३ ते ५ टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे. इथेनॉलकडे नेमकी किती साखर वळविण्यात येईल याबाबत निश्चित माहिती नसल्याने इथेनॉलकडे वळविण्यापूर्वी उत्पादन ३३३ लाख टन होईल, असा अंदाज जाहीर केला.

तोडणीसाठीचे उपलब्ध क्षेत्र, अपेक्षित साखर उत्पादन असे
राज्‍य क्षेत्र (लाख हेक्टर) साखर उत्पादन (लाख टन)
उत्तर प्रदेश २३.३२ ११३.००
महाराष्ट्र १३.१० १११.०२
कर्नाटक ६.२० ५६.११
तमिळनाडू २.०० ८.८४
गुजरात २.३१ ९.९८
इतर ९.१५ ३३.७५
एकूण ५६.०८ ३३३.१०

अशी असेल साखरेची स्थिती लाख टन
यंदाचा शिल्लक साठा (ऑक्‍टोबर २०२४) ९०.५
एकूण उत्पादन(इथेनॉलकडे वळविण्यापूर्वी) ३३३
एकूण उपलब्धता ४२३.५०
देशांतर्गत खप २९०
पुढील वर्षाचा शिल्लक साठा (सप्‍टेंबर २०२५) १३३
तीन महिन्यांचा अपेक्षित साठा ५५
जादा होणारा साठा ७८.५