केंद्राने ऑगस्टसाठी दिलेला कमी साखर कोटा आणि किमान विक्री मूल्यात (एमएसपी) वाढ करण्याच्या हालचालीचा सकारात्मक परिणाम गेल्या आठवड्यात साखर दरावर झाला आहे.एमएसपीत वाढ होण्याच्या शक्यतेने साखरेच्या दरातही गेल्या सप्ताहामध्ये क्विंटलला सरासरी १०० रुपयांची वाढ झाली आहे. या सप्ताहात साखरेच्या किमती ३७०० रुपये क्विंटलच्या आसपास पोहोचल्या आहेत. काही राज्यांमध्ये याहूनही अधिक किमतीने साखर विकली जात असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
येत्या काही दिवसांमध्ये सणासुदींचा काळ सुरू होत असल्याने साखरेला मागणी वाढेल. याचप्रमाणे किमतीतही आणखी सुधारण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती असली तरी अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्यात चढ-उतार आहे. बहुतांश ठिकाणी महत्त्वाचे रस्ते खुले झाले असल्याने कारखान्यांतून साखर मागणीप्रमाणे बाहेर पडेल, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.
जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत महापुराची स्थिती व देशातील बहुतांश भागांमध्ये पाऊस सुरू असल्याने साखर मागणी मंदावली. जुलैच्या उत्तरार्धामध्ये केंद्रीय अन्न सचिवांनी ‘एमएसपी’त वाढ लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर साखर बाजारपेठेतील वातावरण बदलले आहे.
केंद्राने वाढीव एमएसपी जाहीर केल्यास जादा दराने साखर खरेदी करावी लागेल, या शक्यतेने व्यापाऱ्यांनी अनेक कारखान्यांकडून साखरेसाठीची चौकशी सुरू केली आहे. साहजिकच याचा परिणाम साखर विक्री वाढण्यावर होत आहे. सणासुदीचे दिवस सुरू होणार असल्याने मिठाई उद्योगातूनही काही प्रमाणात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
साखर उद्योगातील अनेक संस्थांनी यंदा साखरेचे उत्पादन चांगले होईल, अशी शक्यता वर्तविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिरिक्त साखर उत्पादित होणार नसली तरी गेल्यावर्षी इतकी साखर तरी निश्चितपणे उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशात साखरेचा मुबलक साठा यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी असेल. देशांतर्गत विक्रीसाठी पुरेशी साखर असल्याने निर्यात व इथेनॉल निर्मितीसाठी जादा साखरेची परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने केंद्राकडे करण्यात येत आहे.