anekant.news@gmail.com

9960806673

पाडेगाव केंद्राकडून फुले 15006 वाण विकसित

निरा ः शेतकर्‍यांना अधिकचे चार पैसे मिळवून देणार्‍या फुले 0265 या उसाच्या वाणानंतर आता पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने जादा उत्पादन व साखर उतारा देणार्‍या फुले 15006 हे नवीन वाण विकसित केले आहे. राज्यामध्ये अधिक ऊस आणि साखर उत्पादन असणारे हे नवीन वाण ठरणार आहे. आपण संशोधित केलेले नवीन वाण शेतकर्‍यांच्या शेतात पाहून केंद्रातील शास्त्रज्ञ समाधान व आनंद व्यक्त करीत आहेत.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र गेल्या 90 वर्षांपासून ऊस पिकाचे विविध वाण व उसावरील सुधारित तंत्रज्ञान, यावरील शिफारशी देण्याचे काम करीत आहे. नुकतीच 52 वी संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे पार पडली.

या बैठकीत पाडेगाव संशोधन केंद्राने फुले 15006 हा उसाचा नवीन वाण आडसाली, पूर्व हंगाम आणि सुरू हंगामामध्ये महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत केला. त्याचबरोबर ऊस बेणे मळ्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे द्यावयाची खते, पूर्व हंगामी ऊस आणि खोडव्याच्या अधिक उत्पादनासाठी खतांचे वेळापत्रक, पूर्व हंगामी ऊस व खोडव्याचे व साखरेचे अधिक उत्पादन व फुले द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी जीवाणुंची बीज प्रक्रिया करणे, या चार महत्त्वाच्या शिफारशी केल्या.

आजपर्यंत या संशोधन केंद्राने शिफारशीत केलेले वाण व तंत्रज्ञान शिफाशींमुळे शेतकर्‍यांची तसेच साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी पाडेगाव येथील ऊस विशेषज्ञ, ऊस उत्पादक व सर्व शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. (पुढारी, 30.06.2024)