anekant.news@gmail.com

9960806673

देशाचे साखर उत्पादन ३३३ लाख टन शक्य

यंदाच्या हंगामात साखर उत्पादन ३३३ लाख टन होण्याचा अंदाज इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) वर्तविला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात आलेल्या उपग्रह प्रतिमांच्या आधारे व देशातील विविध साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या बैठकीतून ‘इस्मा’ने हा अंदाज व्यक्त केला आहे.

या नुसार महाराष्ट्रातील साखर उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत ७ लाख टनाने कमी होईल, अशी शक्यता आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रामध्ये ११८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा १११ लाख उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

यंदा केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील सर्व बंधने काढल्याने मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर इथे इथेनॉल निर्मितीसाठी होईल, असा अंदाज असल्याने साखरेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत काही अंशी घट होईल, असे ‘इस्मा’ला वाटते.

महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षी सुरुवातीच्या काळामध्ये पाण्याची मोठी चणचण निर्माण झाल्याने उसाची वाढ चांगली झाली नाही. गेल्या दोन-तीन महिन्यांत मात्र पुरेशा पावसाने उसाची वाढ चांगली झाली. असे असले तरी यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रातील साखर उत्पादन वाढणार नाही, असा अंदाज आहे.

कर्नाटकात मात्र गेल्यावेळी इतकेच म्हणजे ५८ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात ही गेल्या वर्षी इतकीच म्हणजे ११० लाख टन साखर तयार होईल असे गृहीतक आहे. यंदा निवडणुकीमुळे महाराष्ट्रात उसाचा हंगाम डिसेंबरमध्ये जोर धरेल अशी शक्यता आहे. तर कर्नाटकचा हंगाम १५ नोव्हेंबरला सुरू होईल. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात तरी कर्नाटक व उत्तर प्रदेशात साखर उत्पादनात आघाडी घेतील, असे सध्याचे चित्र आहे.

अशी असेल देशाच्या साखर उत्पादनाची स्थिती

इस्माच्या म्हणण्यानुसार, यंदा देशाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ८५ लाख टन साखरेचा साठा देशात शिल्लक होता. यंदाचे साखर उत्पादन ३३३ लाख टन होईल. गेल्या वर्षीची शिल्लक व यंदाचे उत्पादन असे मिळून ४१७ लाख टन साखरेची उपलब्धता होईल. यापैकी २९० लाख टन साखरेची विक्री देशांतर्गत बाजारपेठेत होईल. ४० लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होईल. पुढच्या हंगामासाठी ८७ लाख टन साखरेची उपलब्धता होईल.