anekant.news@gmail.com

9960806673

बळीराजा साखरने शेतक-यांच्या खात्यावर केले साडे अठरा कोटी वर्ग

पूर्णा : येथिल बळीराजा साखर कारखान्याने दसरा दिवाळी पुर्वीच सन २०२३-२४ गाळप हंगामातील एफ.आर.पी प्रमाणे देय ठरलेल्या रक्कमेतील उर्वरित ऊस बिलाचा हप्ता ३०४ रुपये ८४ पैसे प्रती मे.टन प्रमाणे एकूण १८ कोटी ६७ लाख रुपये सभासद शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी दिली. त्यामुळे परिसरातील शेतक-यांचा दसरा, दिवाळी सण गोड होणार आहे.

पुर्णा तालुक्यातील कानडखेड परीसरामध्ये उभारण्यात आलेल्या बळीराजा साखर कारखाना लि., कानडखेडचा २०२३-२४ साला मधील गळीत हंगामात कारखान्याने विक्रमी ६ लाख १२ हजार ६६३.०३ मे.टन उसाचे गाळप करुन सुमारे ७ लाख १५ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्यानुसार सरासरी साखर उतारा ११.८९ एवढा राहीला आहे. त्यानुसार शेतक-यांना एफ.आर.पी प्रमाणे निव्वळ देय प्रती मे.टन २ हजार ८०४ रुपये ८४ पैसे एवढा निघालेला आहे.

या हंगामात कारखान्याने सर्व ऊस पुरवठादार शेतक-यां सोबत ऊस खरेदीचे करार केलेले आहेत. करारातील अटी व शर्ती नुसार कारखान्याने यापुर्वी ऊस पुरवठा करणा-या सर्व शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये प्रती मे.टन रूपये २५०० प्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा केली आहे. उर्वरीत ३०४ रुपये.८४ पैसे प्रती मे.टन प्रमाणे दि.७ पासुन सर्व शेतक-यांच्या बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झाली आहे. याची गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतक-यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कारखाना प्रशासनाने केले आहे.

गळीत हंगाम २०२४-२५साठी कारखान्याकडे तब्बल ७ हजार ५२ हेक्टर ऊस लागवडीची नोंद झालेली आहे. त्यामुळे कारखान्याने संपुर्ण ऊसाचे गाळप केले जाईल असे अश्वासीत केले आहे. या हंगामामध्येही कारखाना ७ लाख मे.टन ऊस गाळप करण्यासाठी उद्दीष्ट ठेवलेले आहे. शेतक-यांना जास्तीत जास्त भाव देण्याचे मानस आहे. कारखान्याच्या ऊस सभासदाचे गाळप झाल्यानंतर उर्वरीत बिगर सभासद शेतकरी यांचा ऊस गाळपासाठी आणला जाईल याची सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी नोंद घ्यावी. कारखान्याने ऊस तोडणी यंत्रणा व ऊस वाहतुक यंत्रणा, कुशल कर्मचारी वर्ग या गळीत हंगामासाठी तत्पर झाला असुन बळीराजा कारखान्यास जास्तीत जास्त शेतक-यांनी आपला ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे अहवान कारखान्याचे चेअरमन जाधव यांनी केले आहे.