anekant.news@gmail.com

9960806673

जगाचे साखर उत्पादन पोहोचले 1860 लाख टनांवर

आगामी वर्षात मुबलक उत्पादन होण्याचा यूएसडीएचा अंदाज

कोल्हापूर ः साखरेच्या आंतरराष्ट्रीय व्यापारी वर्षामध्ये (मे 2023 ते एप्रिल 2024) जगाचे साखर उत्पादन 1860 लाख टन झाले आहे. ब्राझीलने 450 लाख टन साखर उत्पादनासह जगात अग्रक्रम पटकवला आहे. भारत दुसर्‍या क्रमांकावर असून देशात 340 लाख टन साखर उत्पादन झाले. युरोपियन देशांनी मिळून 150 लाख टन साखर तयार केली. अमेरिकेनेही 80 लाख टन साखर उत्पादन केले असल्याची माहिती यूएसडीए या संस्थेने ताज्या अहवालात दिली आहे.

साखर वर्षात ब्राझीलने एकूण उत्पादनाच्या 33 टक्के साखर उत्पादित केली. गेल्या वर्षात ब्राझीलचे साखर उत्पादन व जगातील साखर उत्पादनाची स्क्‍तिी एकमेकाला पूरक ठरली. जगात बहुतांश ठिकाण साखरेचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज होता. यामुळे भारतासह अन्य देशांनी स्वतःची साखरेची गरज भागविण्याकडे लक्ष दिले.

वर्षाच्या सुरूवातीलाच जगातील बहुतेक देशात साखर उत्पादन कमी होईल, असे वातावरण तयार झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे भाव वर्षभर चांगले राहिले, परिणामी ब्राझीलच्या साखरेला वर्षभर मागणी राहिली. साखरेला मागणी आणि दर चांगला असल्याचे लक्षात येताच कारखान्यांनीही साखर उत्पादनावर भर दिला.

जगभरातून मागणी वाढल्याने ब्राझीलमधील बंदरावर जहाजेही मिळणे मुश्किल झाले होते. लाखो टन साखर ब्राझीलच्या बंदरात जहाजांच्या प्रतीक्षेत पडून होती. या उलट भारतासारख्या देशातून मात्र साखर जागतिक बाजारात गेली नाही. परिणामी भारताकडून साखर खरेदी करणार्‍या देशांनाही ब्राझीलचा आधार घ्यावा लागला. ब्राझीलने 400 लाख टनांहून अधिक साखर विविध देशांना निर्यात केली. दर चांगला असल्याने याचा फायदाही कारखान्यांना झाला. (अ‍ॅग्रोवन, 25.05.2024)