केंद्राच्या आदेशाचे पालन अशक्य, साखर उद्योगाची स्पष्ट भूमिका
पुणे ः साखरेसाठी ज्यूट गोण्यांचा वापर न केल्यास येत्या जानेवारीपासून साखर कारखान्यांना मासिक साखर विक्री कोटा दिला जाणार नाही, असा इशारा केंद्र शासनाने दिला आहे. मात्र ज्यूट गोण्यांचा वापर वाढवता येणार नसल्याचे साखर उद्योगाने स्पष्ट केले आहे.
राज्याचा गाळप हंगाम येत्या 3-4 महिन्यांत सुरू होईल. केंद्राच्या आदेशानुसार, 2024-25 मधील साखर हंगामापासून साखर उत्पादनाच्या एकूण 20 टक्के प्रमाणात ज्यूट गोण्यांचा वापर बंधनकारक केला गेला आहे. केंद्राच्या आदेशाचे पालन न करणार्या कारखान्यांना जानेवारी 2025 पासून मासिक साखरविक्री कोटा मिळणार नाही, अशीही तंबी देण्यात आली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार देशातील ज्यूट उत्पादकांना मदत करण्यासाठी ज्यूट गोण्यांचा वापर वाढविण्याची केंद्राची भूमिका आहे. ज्यूट उत्पादकांच्या हितासाठी 1987 मध्ये वेगळा कायदादेखील करण्यात आला. हा कायदा अद्याप लागू आहे.
देशभर साखर उद्योगाकडून ज्यूट गोणी वापर किमान 20 टक्के व्हावा, असे बंधन केंद्राने टाकले आहे. परंतु हा वापर केवळ 7 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे 1987 मधील कायद्याचा कलम 3(1) मधील तरतुदीच्या आधारे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने पुन्हा एकदा आदेश जारी केला. ज्यूट गोण्यांच्या वापराबाबत घोषित टक्क्यांपेक्षा कमी वापर केल्यास कारवाईचे अधिकार केंद्राला आहेत.
परंतु राज्यात आतापर्यंत कारवाईची घटना घडलेली नाही. राज्यातील कारखान्यांना दरवर्षी साखर साठवणुकीसाठी 2000 लाखांहून अधिक गोण्यांंची वापर करावा लागतो. त्यासाठी किमान 400 लाख ज्यूट गोण्यांचा वापर अपेक्षित आहे. परंतु उपलब्धता आणि आर्थिक गणित जुळत नसल्यामुळे बहुतेक कारखाने ज्यूट गोण्यांचा वापर टाळतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
खासगी कारखान्याच्या एका पदाधिकार्याने सांगितले की ज्यूट गोण्यामध्ये साखर साठवणे योग्य नाही. मुळात निर्यातीची साखर अशा गोण्यांमध्ये इतर देश स्वीकारत नाहीत. ज्यूटचे धागे साखरेत मिसळत असल्यामुळे आरोग्यविषयक मुद्दे उपस्थित होतात. याशिवाय प्लॅस्टिक गोण्याच्या तुलनेत ज्यूट गोणी चौपटीने महाग आहे.
उद्योगाला खुश करण्यासाठी खटाटोप - वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.बी. ठोंबरे म्हणाले, की ज्यूट गोणीनिर्मिती उद्योगाला खूश करण्यासाठी खटाटोप केला जात आहे. त्यामुळेच ज्यूट गोण्या वापराची सक्ती केली जात आहे. परंतु या गोण्यांचाृ वापर परवडणारा नाही. सध्या वापरली जाणारी प्लॅस्टिक गोणी सर्व अंगानी उपयुक्त, किफायतशीर आणि आरोग्यदायी आहे. केंद्राने साखर उद्योगाची सोय विचारात घ्यावी असे वाटते. (अॅग्रोवन, 25.07.2024)