anekant.news@gmail.com

9960806673

निफाडमधील साखर कारखाने बंदच; प्रतिवर्षीप्रमाणे ऊस जाणार जिल्ह्याबाहेर

निफाड : तालुक्यातील गोदाकाठ भागातील उसाच्या मळ्यात ऊसतोडणी कामगार दाखल झाले असून, तालुक्यातील चारही बाजूच्या रस्त्यांनी उसाने भरलेले ट्रक जातानाचे चित्र दिसत आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांना ऊस पुरवणाऱ्या निफाड तालुक्यातील दोन्ही कारखाने मात्र बंद आहेत. हे विरोधाभासी चित्र ऊस उत्पादक मात्र खिन्न नजरेने पाहत आहेत.

कादवा आणि गोदावरी या दोन नद्यांच्या खोऱ्यात पाण्याची उपलब्धता असल्याने निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाची शेती केली जाते. त्यामुळे निफाड तालुक्यात अनेक राजकीय धुरीणांनी साखर कारखानदारी सुरू केली. सहकारी तत्त्वावरील निफाड आणि रानवड सहकारी साखर कारखान्यांची तालुक्यात मुहूर्तमेढ रोवली गेली. कादवा गोदा शुगर कारखाना अगदी अलीकडच्या काळात सुरू झाला. परंतु, दृष्ट लागावी तसे हे कारखाने १० वर्षांपासून बंद आहेत. आमदार दिलीप बनकर यांनी तीन वर्षे रानवड साखर कारखाना चालवला; परंतु, यंदा तो देखील बंद आहे. निफाड तालुक्यात आजमितीला जवळपास १० लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे.

तालुक्यातील कारखाने बंद असल्याने हा ऊस संगमनेर, कोळपेवाडी (ता. कोपरगाव), संजीवनी (ता. कोपरगाव), द्वारकाधीश (ता. बागलाण), प्रवरा (ता. राहता), नाशिक साखर कारखाना (ता. नाशिक), रावळगाव (ता. मालेगाव), कादवा (ता. दिंडोरी) यांच्यासह इतरही साखर कारखाने गेली अनेक वर्षे घेऊन जात आहेत. साधारण १०० किमी परिघातील साखर कारखान्यांना निफाड तालुक्यातील ऊस जात आहे. वरील सर्व कारखाने उत्तमरित्या सुरू आहेत. मग, निफाडच्या ३० किमी परिघातील साखर कारखानेच का बंद पडले हा संशोधनाचा विषय ठरावा. निफाडमधील कारखानदारी कोणी देशोधडीला लावली? यावर चर्चा, आरोप-प्रत्यारोप करण्यात १० वर्ष संपली. येथील राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्यांनी केवळ निवडणुकीपुरताच हा मुद्दा चर्चेत ठेवला.

निफाड तालुक्यातील कारखाने बंद असल्याने येथील उत्पादकांना अनेकदा ऊस तोडीसाठी जिल्ह्याबाहेरील कारखान्यांचे उंबरे झिजवावे लागतात. प्रसंगी खर्च करून ऊस तोडायची वेळ येते त्यात आर्थिक नुकसान होते. त्यामुळे अलिकडील काळात ऊस लावण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तालुक्यातील कोठुरे, नांदूरमध्यमेश्वर, सायखेडा, शिंगवे, सोनगाव, भुसे, भेंडाळी, निफाड, तामसवाडी, खेडलेझुंगे, काथरगाव, कुरुडगाव, चांदोरी, पिंपळस या गोदाकाठावरील अनेक गावांत उसाची शेतीच मोठ्या प्रमाणात केली जाते. आता येथील शेतकरी ऊसाऐवजी कांदा, टोमॅटोसह इतर भाजीपाला पिकांकडे वळले आहेत.