anekant.news@gmail.com

9960806673

अद्यापही 100 लाख टन उसाचे गाळप अपेक्षित

ऊस उत्पादनाचा अंदाज पुन्हा एकदा चुकला, 91 लाख टन साखर तयार

पुणे ः राज्यातील ऊस गाळप हंगाम 3 महिने चालण्याचा साखर आयुक्तालयाचा अंदाज पुन्हा एकदा चुकला असून, मार्च महिन्यातही कारखान्यांची धुराडी सुरू राहतील, असे चित्र आहे. सद्यःस्थितीत 906 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून, सुरूवातीच्या अपेक्षित अंदाजाइतके ऊस गाळप आताच पूर्ण झाले आहे. 10.3 टक्के सरासरी उतार्‍यानुसार साखरेचे 91 लाख टन उत्पादन हाती आले आहे. अद्यापही 80 ते 100 लाख टन ऊस गाळप होणे बाकी असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

राज्यात चालूवर्ष 2023-24 च्या हंगामात मंत्री समितीच्या बैठकीतील माहितीनुसार ऊस पिकाखालील एकूण क्षेत्र 14.07 लाख हेक्टर इतके आहे. त्यातून 1 हजार 22 लाख टन उसाची उपलब्धता अपेक्षित होती. प्रत्यक्षात 90 टक्के गाळपास येणे अपेक्षित धरता साखर कारखान्यांकडून 921 लाख टन उसाचे गाळप आणि 103.58 लाख टन साखरेचे उत्पादन हाती येण्याचा अंदाज होता.

चालू वर्षी हंगाम 3 महिने चालण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. त्यापेक्षा अधिक हंगाम सुरू आहे. मार्च महिनाअखेर अद्यापही सुमारे 80 ते 100 लाख टन उसाचे गाळप अपेक्षित मानले जात आहे. त्यातून साखरेचे उत्पादनही 105 लाख टनांहून अधिक होईल, अशी सद्यःस्थिती आहे. त्यामुळे उसाच्या उपलब्धतेची आकडेवारी आणि त्यावरून प्रत्यक्षात धरण्यात येणार्‍या ऊस गाळपाचा अंदाज दरवर्षीप्रमाणेही चालू वर्षीही चुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

13 साखर कारखान्यांची धुराडी बंद - राज्यात यंदाच्या हंगामात 103 सहकारी, 104 खासगी मिळून 207 साखर कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. 29 फेब्रुवारीअखेर 13 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ऊस संपल्याने बंद झाला आहे. त्यामुळेे दैनिक ऊस गाळप क्षमताही कमी झाली असून, ऊसतोडणीस मजुरांची टंचाई भेडसावत असल्यानेही हंगाम मंदावल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. (पुढारी, 04.03.2024)