साखर आयुक्तालयाने दिले 100 कारखान्यांना परवाने
पुणे ः राज्याचा ऊस गाळप हंगाम गुरूवार दि. 15 पासून सुरू करण्यास अखेर राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे साखर आयुक्तालयाने जवळपास 100 साखर कारखान्यांना गाळप परवानेदेखील दिले आहेत.
राज्याचा ऊस गाळप हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय यापूर्वी मंत्रि समितीने घेतला होता. परंतु काही राजकीय नेत्यांनी त्यात खोडा घालून हंगाम 20 नोव्हेंबरनंतर सुरू करण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे कोणत्याही कारखान्याला तूर्त गाळपाचा परवाना देऊ नये अशी भूमिका राज्य शासनाने घेतली होती. या भूमिकेला साखर संघ व विस्माने कडाडून विरोध केला. त्यामुळे राज्य सरकार नमले व गुरूवार दि. 14 रोजी अंदाजे 100 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले.
काही कारखान्यांचे परवाने तूर्त थांबवले - साखर आयुक्तालयाचा परवाना मिळविणार्या पहिल्या टप्प्यातील कारखान्यांमध्ये 50 सहकारी व 49 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आयुक्तालयाकडे यापूर्वी 101 सहकारी व 104 खासगी कारखान्यांनी परवाना मिळण्यासाठी अर्ज केलेले होते. या अर्जाची छाननी केली जात आहे. गाळप परवाना देण्यासाठी अटीशर्ती निश्ति करण्यात आलेल्या आहेत. अटींमध्ये बसणार्या कारखान्यांनाच परवाने दिले जात आहेत. 15 ते 17 कारखान्यांकडून अटींचे पालन होत नसल्यामुळे त्यांना परवाना वाटप तूर्त थांबवण्यात आलेले आहे, अशी माहिती साखर उद्योगातील सूत्राने दिली. (अॅग्रोवन, 15.11.2024)