केंद्र सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाला प्रोत्साहन देत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम कंपन्या इथेनॉल खरेदी करत आहेत. २०२४-२५ सालामध्ये पेट्रोलियम कंपन्या तब्बल ९७१ कोटी लीटर इथेनॉल खरेदी करणार असून यापैकी ३९१ कोटी लीटर इथेनॉलची खरेदी साखर उद्योगातून केली जाणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून खेरदी होणाऱ्या इथेनॉलमध्ये उसाच्या बी हेवी तसेच सी हैवी मोलॅसिसपासून बनवलेल्या इथेनॉलचा समावेश आहे. तर उर्वरित ५७४ कोटी लीटर इथेनॉलचा पुरवठा इतर माध्यमातून बनवलेल्या इथेनॉलचा असेल.
रूरल व्हाईसच्या वृत्तानुसार, उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची मात्रा २३३ कोटी लीटर आहे. याशिवाय बी हेवी मोलॅसिसपासून होणाऱ्या इथेनॉलचे प्रमाण १४७ कोटी लीटर आणि सी हेवी मोलॅसिसचे प्रमाण ११ कोटी लीटर निश्चित करण्यात आले आहे. सर्वाधिक कोटा मक्याच्या इथेनॉलसाठी असून तो ४७४ कोटी लीटर निश्चित करण्यात आला आहे. जो साखर उद्योगातून पुरवल्या जाणाऱ्या इथेनॉलपेक्षा अधिक आहे. तसेच, डेमेज ग्रेन ज्यामध्ये मुख्यत्वे तांदूळ असून तांदळ्याच्या इथेनॉलची कोटा १०० कोटी लीटर ठरवण्यात आला आहे. यामुळे अन्नधान्यांपासून बनवलेला इथेनॉलचा एकूण कोटा ५७४ कोटी लीटर निश्चित करण्यात आलेला आहे.
केंद्र सरकार चालू हंगामात (२०२४-२५) ४० ते ४५ लाख टन साखरेचा वापर इथेनॉलच्या निर्मिती करण्यासाठी परवानगी देऊ शकते. पण मक्यासाठी देण्यात आलेली सूट भविष्यात मका आयात करण्याचे संकट निर्माण करू शकते असे उद्योग जगतातील तज्ज्ञांचे मत आहे. कारण मका सर्वात जास्त कुकूट पालनातील पोल्ट्री उद्योग आणि पशू धनाच्या चाऱ्यासाठी वापरला जातो. गेल्या वर्षी २०२३-२४ मध्ये देशात एकूण ३७६.६५ लाख टन मक्याचे उत्पादन झाले होते. २०२२-२३ मध्ये ते ३८०.८५ लाख टन होते. तर २०२१-२२ मध्ये मक्याचे देशभरात ३३७.३० लाख टन उत्पादन झाले होते.
गेल्या दोन वर्षांत मक्याच्या किमतीत सुधारणा झाली असून यंदा मक्याला हमीभावापेक्षा चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. मक्याचे किमान समर्थन मूल्य २०२३-२४ मध्ये २०९० रुपये प्रति क्विंटल होते. यात यंदा १३५ रूपयांची वाढ करण्यात आली. यामुळे यंदा मक्याला हमीभाव २२२५ रूपये प्रति क्विंटल निश्चित झाला आहे. दरम्यान मत्स्य, पशुपालन आणि दुग्घ मंत्रालयाच्या सचिव अल्का उपाध्याय यांनी पोल्ट्री उद्योगाच्या मागणीवरून ३० लाख टन मक्याची आयात करण्याची शिफारस केली होती. मात्र ही आयात झालेली नाही. पण येणाऱ्या काळात पोल्ट्री उद्योगाकडून अशी मागणी पुन्हा होण्याची शक्यता आहे. अशावेळी उद्योगातील जानकारांचे मक्यातून इथेनॉलच्या निर्मितीचे ठेवलेले लक्ष योग्य नाही, असे मत आहे.