anekant.news@gmail.com

9960806673

कोट्यावधी लिटरचे स्पिरीट, अल्कोहोलचे साठे पडून

केंद्राच्या हलगर्जीपणा, अधिसूचना रद्द करण्याची मागणी

पुणे ः इथेनॉल बंदीबाबत केंद्र शासनाने यापूर्वी काढलेल्या अधिसूचना अद्यापही रद्द केलेल्या नाहीत. त्यामुळे राज्यात कोट्यावधी लिटर आरएस व ईएनएचे साठे पडून असल्याची माहिती साखर उद्योगातून देण्यात आली. केंद्राने लादलेल्या एकतर्फी इथेनॉल बंदीमुळे साखर उद्योगाची हानी झाली आहे. केंद्राने ही बंदी मर्यादित प्रमाणात हटविण्यात घोषणा केली आहे. परंतु साखर कारखान्यांना त्यांच्या ताब्यातील रेक्टिफाइड स्पिरीट (आरएस) व इक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ईएनए) विकण्याचा मार्ग मोकळा करू न दिलेला नाही.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार इथेनॉल बंदीबाबत केंद्राने 7 डिसेंबर व 15 डिसेंबरला अधिसूचना काढल्या होत्या. त्या रद्द न केल्याने त्यातील तरतुदी अद्यापही लागू आहेत. परिणामी साखर उद्योग सध्या देशाच्या औषधे निर्मिती कंपन्यांना आरएस, ईएनए विकू शकत नाही. साखर कारखान्यात आधी मळीपासून अल्कोहोल तयार केले जाते. त्यानंतर आरएस, ईएनए व इथेनॉल असे उपपदार्थ तयार केेले जातात. बंदीमुळे तीनही उपपदार्थांचे मोठे साठे पडून होते. त्यापैकी इथेनॉल खरेदीची प्रक्रिया तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) सुरू केलेली आहे. परंतु आरएस, ईएनएच्यासाठ्यांचे नेमके काय करायचे, या चिंतेत साखर उद्योग आहे.

दरम्यान, साखर उद्योगातील एका शिष्टमंडळाने अलीकडेच तेल विपणन कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांचगी भेट घेतली. तेल कंपन्यांना सध्या पडून असलेल्या इथेनॉल साठ्यांबाबत समजावून सांगितले गेले आहे. तेल कंपन्यांनी इथेनॉल खरेदीच्या निविदा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर तिमाहीसाठी काढल्या आहेत.

तसेच आता उसाचा रस, पाक आणि बी हेव्ही मळीपासून तयार झालेले इथेनॉल विकत घेण्याची तयारी दाखविली आहे. परंतु साखर उद्योगाकडे पडून असलेल्या साठ्यांमधील इथेनॉल चालू म्हणजेच (मे, जून, जुलैच्या) तिमाहीत देखील खरेदी करावे, असा आग्रह साखर उद्योगाच्या शिष्टमंडळाने तेल कंपन्यांकडे धरला आहे. परंतु तेल कंपन्यांनी याबाबत काहीही धोरण स्पष्ट केलेले नाही.

मागणीपेक्षा जादा पुरवठ्याची ऑफर - तेल कंपन्यांनी ऑगस्ट ते ऑक्टोबर तिमाहीसाठी 67 कोटी लिटर इथेनॉल खरेदीच्या निविदा मागविल्या आहेत. प्रत्यक्षात इथेनॉल उद्योगाकडे भरपूर साठा असल्याने प्रत्यक्षात पुरवठा होकार पत्रे (ऑफर लेटर) तब्बल 84 कोटी लिटरपर्यंतची आली आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर तिमाहीसाठी आलेल्या जास्तीच्या ऑफरमधून आधीच्या म्हणजेच मे ते जुलै तिमाहीमधील तूट भरून काढतो येऊ शकते. कारण मे ते जुलैच्या तिमाहीत तेल कंपन्यांना मका निर्मिती इथेनॉलचा पुरवठा पुरेसा झालेला नाही. त्यामुळेच जुलैपर्यंत दिसत असलेली तिमाहीतील तूट सध्याच्या ऑफरमधून भरून काढावी असा आग्रह साखर उद्योगाने धरलेला आहे. (अ‍ॅग्रोवन, 09.07.2024)