कोल्हापूर ः देशातील साखर हगाम 1 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 85 साखर कारखाने सुरू झाले आहेत.गेल्या वर्षीपेक्षा 10 साखर कारखाने यंदा उत्तर प्रदेशात जादा सुरू झाले आहेत. 15 नोव्हेंबरअखेर महाराष्ट्रात एकाही कारखान्याने गाळप सुरू केले नाही. गेल्या वर्षी या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 103 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते.
देशात 15 नोव्हेंबर अखेर 144 साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. गेल्याा वर्षी याच कालावधीत 264 साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले होते. यंदा महाराष्ट्रातील कारखाने अद्याप सुरू न झाल्याने याचा परिणाम हंगामाच्या प्रारंभी झाला आहे. देशात आतापर्यंत 7 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्यावर्षी 13 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 4 लाख मे.टन साखरेचे उत्पादन झाले आहे.तर कर्नाटकात 2 लाख मे.टन साखर तयार झाली आहे. पहिल्या महिन्याच्या कालावधीत उत्तर प्रदेशात सरासरी साखर उतारा 7.8 टक्के, तर कर्नाटकाचा 8 टक्के आहे.
कर्नाटकात 40 कारखान्यांनी गाळपास प्रारंभ केला आहे. उत्तर प्रदेश व कर्नाटक वगळता अन्य कोणत्याही राज्यांमध्ये हंगाम फरसा वेगाने सुरू झाला नाही. गुतरातमध्ये 13 कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. उत्तर प्रदेशात 48 लाख टन तर कर्नाटकात 26 लाख टन उसाचे गाळप झाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार यंदा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये साखरेचे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी टंचाईमुळे मध्य महाराष्ट्र व कर्नाटकात काही ठिकाणी लागवड कमी झाल्याने त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर होईल, असे महासंघाचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये 103 लाख टन तर महाराष्ट्रात 110 लाख टन तर कर्नाटकमध्ये 53 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा उत्तर प्रदेशमध्ये 98 लाख टन, महाराष्ट्रात 87 लाख टन तर कर्नाटकमध्ये 45 लाख टन साखरेचे उत्पादन होईल अशी शक्यता महासंघाने वर्तवली आहे. (अॅग्रोवन, 16.11.2024)