नवी दिल्ली :
देशातील सर्व २६० सहकारी साखर कारखाने व नऊ राज्यातील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या शिखर संस्थेमार्फत दरवर्षी देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. त्याआधारे ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, सर्वोत्तम साखर उतारा, सर्वात ज्यास्त साखर निर्यात अशा विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांचे काटेकोर मूल्यमापन केले जाते.
त्याआधारे केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे वर्ष २०२२-२३ साठीची निश्चित केलेली एकूण २१ पारितोषिके राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी आज जाहीर केली. याप्रसंगी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. यंदाच्या (२०२२-२३) वर्षीच्या गुणवत्ता पारितोषिकासाठी देशातून ९२ सहकारी साखर कारखान्यांनी भाग घेतला. त्यात महाराष्ट्र (३८), उत्तर प्रदेश (११), गुजरात (११), तामिळनाडू (१०), पंजाब (८), हरियाणा (८), कर्नाटक (४) आणि मध्य प्रदेश व उत्तराखंड (प्रत्येकी एक) सहभागी झाले होते.
पारितोषिक योजनेच्या धोरणानुसार देशातील उच्च साखर उतारा (किमान सरासरी १० टक्के) असणाऱ्या महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटक या राज्यांचा एक गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ५३ सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग होता. उर्वरित (सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी उतारा) राज्यांचा दुसरा गट तयार करण्यात आला. या गटात देशातील एकूण ३९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश करण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तराखंड इत्यादी राज्यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच एका कारखान्याला एक पारितोषिक असे धोरण ठरविण्यात आले. या दोन्ही धोरणांमुळे सर्व कारखान्यांच्या कामगिरीला न्याय मिळतो. तसेच ज्यास्तीत ज्यास्त कारखान्यांना पारितोषिक मिळविता येतात जेणेकरून त्यांचा उत्साह वाढतो व ते आपल्या कामगिरीमध्ये आणखी प्रगती करण्यास प्रोत्साहित होतात.
पारितोषिकांचे मूल्यांकन करण्यासाठी ११ सदस्यांच्या तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यात केंद्रीय मुख्य संचालक (साखर) यांच्याशिवाय मुख्य संचालक, राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ नवी दिल्ली, उप संचालक (साखर) नवी दिल्ली, संचालक राष्ट्रीय साखर संस्था, कानपुर, महासंचालक वसंतदादा साखर संस्था पुणे, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, गुजरात, तामिळनाडू या राज्यांच्या साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आणि इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षीचा पारितोषिक वितरणाचा विशेष सोहळा नवी दिल्ली येथे ऑगस्ट मध्ये होत आहे. या शानदार सोहळ्यासाठी विशेष अतिथींना निमंत्रित करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय पारितोषिकांचा तपशील
**** उत्कृष्ट ऊस उत्पादकता/उच्च उतारा विभाग
प्रथम : क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड शेतकरी सहकार कारकखाना लि. पो, कुंडल, ता. पलूस, जि.सांगली (महाराष्ट्र)
द्वितीय : लोकनेते सुंदररावजी सोळुंके सहकारी साखर कारखाना लि. सुंदरनगर. ता. माजलगाव, जि .बीड (महाराष्ट्र)
**** तांत्रिक कार्यक्षमता/उच्च उतारा विभाग
प्रथम : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. पो. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर (महाराष्ट्र)
द्वितीय : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लि. जुन्नर आंबेगाव, निवृत्तीनगर पो. शिरोली. ता. जुन्नर, जि. पुणे (महाराष्ट्र)
****उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन/उच्च उतारा विभाग
प्रथम : श्री खेडूत सहकारी खंड उद्योग मांडली लि. सरदार बाग, बाबेन-बार्डोली, जि. सुरत (गुजरात)
द्वितीय : श्री नर्मदा खंड उद्योग सहकारी मंडली लि. धरीखेडा, पोस्ट तिंबी, ता. राजपिपला (नांदोड), जि. नर्मदा (गुजरात)
****विक्रमी ऊस गाळप/उच्च उतारा विभाग
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि. गंगामाईनगर-पिंपळनेर, ता. माढा, जि. सोलापूर (महाराष्ट्र)
*****विक्रमी ऊस उतारा/उच्च उतारा विभाग
डॉ पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि. मोहनराव कदम नगर, पो. वांगी, ता. कडेगाव, जि. सांगली (महाराष्ट्र)
*****अत्युत्कृष्ट साखर कारखाना/उच्च उतारा विभाग
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना ली. कागल, श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन, ता. कागल, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)
****विक्रमी साखर निर्यात
प्रथम : जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. श्री कल्लप्पाअण्णा आवाडेनगर, पो. हुपरी-येलगुड, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (महाराष्ट्र)
द्वितीय : सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता.कराड, जि. सातारा (महाराष्ट्र)
****उर्वरित विभाग उत्कृष्ट ऊस उत्पादकता
प्रथम : दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. अनुपशहर (बुलंदशहर) पो. चिनी मिल, जहांगिराबाद (उत्तर प्रदेश)
द्वितीय : दि नाकाडोर कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि. पो. मेहातपुर ता. नाकाडोर जि. जालंदर (पंजाब)
**** तांत्रिक कार्यक्षमता
प्रथम : दि कर्नाल कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि. मेरुत रोड, जि. कर्नाल (हरियाणा)
द्वितीय : दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. नजीबाबाद, जि. बिजनोर (उत्तर प्रदेश)
****उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन
प्रथम : कल्लाकुरिची II कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि. काचीरायापलयम. ता. कल्लाकुरिची. जि. विल्लूपुरम (तामिळनाडू)
द्वितीय : दि किसान सहकारी चिनी मिल्स लि. गजरौला हसनपूर. ता. हसनपूर जि. अमरोहा (उत्तर प्रदेश)
****विक्रमी ऊस गाळप
रामाला सहकारी चिनी मिल्स लि. रामाला बरूत, दिल्ली सहारनपूर रोड, जि. बागपत (उत्तर प्रदेश)
****विक्रमी ऊस उतारा
नवलसिंग सहकारी शक्कर कारखाना मर्यादित. नवलनगर. पो. निंबोला, जि. बुऱ्हाणपूर (मध्य प्रदेश)
****अत्युत्कृष्ट साखर कारखाना
उर्वरित विभाग डी. एस. ८ सुब्रमनिया शिवा कॉपरेटिव्ह शुगर मिल्स लि. गोपालापूरम, अलापूरम पोस्ट, ता. पप्पीरेड्डीपट्टी. जि. धर्मापुरी (तामिळनाडू)
एकूण २१ पारितोषिकात महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला असून दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशाला चार पारितोषिके प्राप्त झाली. गुजरात, तामिळनाडूने प्रत्येकी दोन पारितोषिके मिळविली तर पंजाब, हरियाणा व मध्य प्रदेशाला प्रत्येकी एक पारितोषिक मिळाले. यंदाच्या वर्षाचे संपूर्ण देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठीचे मानाचे वसंतदादा पाटील पारितोषिक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि, दत्तात्रयनगर, ता. आंबेगाव, जि. पुणे (महाराष्ट्र) यास मिळाले आहे.