केंद्राने साखर उद्योगावरील निर्बंध कमी करत गेल्या पंधरवड्यापासून अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) व इथेनॉलच्या दरात वाढ करण्याच्या मानसिकतेत केंद्र सरकार आहे या बाबत माहिती घेण्याचे काम गतीने सुरू झाले असून, येत्या काही दिवसांत दोन्ही निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
विशेष करून इथेनॉलच्या किमती वाढविण्यासाठी सरकार अधिक अनुकूल असल्याने नव्या किमती येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे. हे दोन्ही निर्णय झाल्यास गेल्या वर्षी अनेक अनाकलनीय निर्णयांच्या बळी ठरलेल्या साखर उद्योगाला बूस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे.
सध्या उसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर ६५ रुपये ६१ पैसे, बी हेवी आणि सी हेवी मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलला अनुक्रमे ६० रुपये ७३ पैसे, ५६ रुपये २८ पैसे असा दर आहे. गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीवर बंधने आणल्यानंतर निर्मितीवर परिणाम झाला. कोट्यवधी रुपयांचे भांडवल अडकून पडले.
हे नुकसान भरुन काढण्यासाठी केंद्र आता इथेनॉल दरवाढ करून इथेनॉल प्रकल्पांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहे. देशाचा हंगाम सुरू होण्यास केवळ पंधरा दिवसांचा कालावधी उरला आहे. हंगाम सुरू होण्याअगोदरच केंद्राने हा निर्णय जाहीर केल्यास इथेनॉल उत्पादनाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
साखर एमएसपी वाढीचा निर्णय यंदाच्या हंगामासाठी मोठा दिलासादायक ठरू शकतो. तोही आताच घेतल्यास शिल्लक पडणारा साखर साठ्याची विक्री गतीने होवू शकेल. साखर साठवणुकीचा अतिरिक्त खर्चातही बचत होऊन कारखान्यांना दिलासा मिळेल असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. सध्या साखरेच्या एमएसपी पेक्षा ३०० ते ४०० रुपयांनी जास्त म्हणजे ३५०० ते ३६०० रुपयांच्या आसपास आहे.
हंगाम सुरू होण्याअगोदर निर्णयाची अपेक्षासध्या मागणी कमी असल्याने साखर बाजार सध्या शांतच आहे. एमएसपी वाढीचा निर्णय झाल्यास साखरेच्या किमतीत वाढ होऊन साखरेचा उठाव वाढेल असा अंदाज आहे. केंद्राने इथेनॉल आणि साखरेच्या दरात वाढीचे सकारात्मक संदेश दिले असले तरी हे निर्णय हंगाम सुरू होण्याच्या आत व्हावेत, अशी अपेक्षा साखर उद्योगाची आहे.