कोट्याच्या 90 टक्के साखर विक्रीचा केंद्र सरकारचा दबाव कायम
कोल्हापूर ः गेल्या पंधरवड्यापासून साखर दरात घसरण होत असल्याने साखर कारखाने हवालदिल झाल आहेत. गेल्या पंधरवड्यात साखरदरात क्विंटलमागे 50 रूपयांची घसरण झाली. सध्या साखरेस 3400 ते 3450 रूपये क्टिंटल दर मिळत आहे.
कारखान्यांना सध्या मिळेल त्या दरात साखरेची विक्री करावी लागत आहे. केंद्राने नुकत्याच दिलेल्या कोट्याच्या 90 टक्के साखरेची विक्री कारखान्यांनी करावी अन्यथा त्यांचा पुढील महिन्यातील कोटा घटवण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हान आहे. एकीकडे केंद्राचा साखर विक्रीचा दबाव आणि दुसरीकडे साखरेचा अपेक्षित दर मिळत नसल्याने कारखान्यांच्या अपेक्षित दर मिळत नसल्याने कारखान्यांच्या अडचणीत भर पडत आहे.
संक्रांतीच्या दरम्यान साखरेला बर्यापैकी मागणी होती. संक्रांत झाल्यानंतर मात्र साखरेच्या मागणी व दरातही घट होत गेली. सध्या फेब्रुवारी महिना सुरू असला तरी अजूनही उन्हाचा कडाका कुठेच नसल्याने आईस्क्रिम व शीतपेये यासाठीची साखर खरेदी होत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे केंद्राने कोणत्याही परिस्थितीत देशाच्या अंतर्गत बाजारपेठेत साखरेची चणचण होऊ नये यासाठी जादा प्रमाणात कोटे देण्यास सुरूवात केली आहे. जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 5 ते 10 लाख टनांनी उत्पादन कमी असले तरी मुबलक साखर कोट्याम ुळे सध्या तरी बाजारात साखर उपलब्ध नाही अशी स्थिती नाही, येणार्या कालावधीत साखरेची टंचाई जाणवेल असेही चित्र दिसत नाही.
उत्तर प्रदेशबरोबर महाराष्ट्रातील साखर कारखाने अजूनही एक महिनाभर हंगाम सुरू ठेवण्याची शक्यता असल्याने पुढील काळात गेल्या वर्षी इतकेच उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यापार्यांचा आहे. यातच केंद्राने इथेनॉलसाठी वळणार्या साखरेवरही निर्बंध आणले आहेत. या सर्वांचा परिणाम मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध होण्यावर झाला आहे.
येथून पुढील दोन महिन्यांंमध्ये तरी आवश्यक तेवढी साखर निश्चित मिळेल, असा अंदाज व्यापार्यांचा असल्याने ज्या प्रमाणात साखर खरेदीसाठी स्पर्धा व्हायला हवी होती तेवढी होत नसल्याने साखर कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. या सगळ्याचा विपरित परिणाम साखरेचे दर न वाढण्यावर होत आहे.
राज्यातील कारखान्यांना जादा फटका - ईशान्येकडील राज्यांमध्ये उत्तर प्रदेश व महाराष्ट्राची साखर मोठ्या प्रमाणात जाते. सध्या पात्र मात्र ही राज्ये उत्तर प्रदेशातील साखरेला जादा पसंती दाखवत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांपेक्षा ईशान्येकडे साखर पाठवणे महाग पडते. ईशान्येकडील राज्येही महाराष्ट्रापेक्षा उत्तरेकडील साखर स्वस्त पडत असल्याने या साखरेला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. यामुळे महाराष्ट्रातील साखर विक्री कासवगतीने होत असल्याचे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले. (अॅग्रोवन, 20.02.2024)