anekant.news@gmail.com

9960806673

राज्यात आतापर्यंत 33 कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

पुणे ः राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात 207 खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत 966 लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत 97.7 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी साखरेचा उतारा 10.11 टक्के इतका मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत 33 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली असून, सर्वाधिक 9 कारखाने सोलापूर विभागातील तर संभाजीनगर विभागातील 8 कारखाने बंद झाले आहेत.

राज्यात यंदा 207 सहकारी व खासगी कारखान्यांनी परवाना घेतला होता. त्यात 103 सहकारी व 104 खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी आतापर्यंत 966.82 लाख टन उसाचे गाळप केले आहे. सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात 11.45 टक्के असून, त्याखालोखाल पुणे विभागाचा साखर उतारा 10.39 टक्के इतका आहे. नांदेड विभागात यंदा विक्रमी 10.09 टक्के साखर उतारा आला आहे.

राज्यात सर्वाधिक उतारा कोल्हापूरचा - कोल्हापूर विभागाने आतापर्यंत 223 लाख टन ऊस गाळपातून 25.6 लाख टन साखर उत्पादित केली आहे. पुणे विभागात 204 लाख टन ऊस गाळपापासून 21.2 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या विभागाचा सरासरी साखर उतारा 11.45 टक्के इतका आला आहे. त्या खालोखाल सोलापूर विभागाने देखील 201 लाख टन उसचे गाळप करून 18.7 लाख टन साखर उत्पादित केली आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा 9.28 टक्के आहे. नगर विभागात 124 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून 12.4 लाख टन साखर तयार झाली आहे. नगर विभागाचा साखर उतारा 9.91 टक्के इतका आहे.

सर्वाधिक कमी उतारा नागपूर विभागाचा - अमरावती विभागात 9 लाख टन ऊस गाळपातून 8 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. या विभागाचा साखर उतारा 9.26 टक्के आहे. सर्वात कमी 3 लाख टन उसाचे गाळप नागपूर विभागात करण्यात आले असून, येथे केवळ 1.13 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. राज्यात सर्वात कमी केवळ 5.41 टक्के साखर उतारा नागपूर विभागाचा आहे.

नांदेड विभागाचा उतारा 10.09 टक्के - छत्रपती संभाजीनगर विभागातून 90 लाख टन उसाच्या गाळपामधून 7.9 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा 8.8 टक्के इतका आहे. नांदेड विभागात 109 लाख टन गाळपातून 11 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. या विभागाचा साखर उतारा 10.09 टक्के इतका आहे. (लोकमत, 12.03.2024)