मे अखेरची स्थिती ः 12.48 टक्क मिश्रणाचा टप्पा पार
कोल्हापूर ः देशाने मे अखेरपर्यंत सुमारे 12.48 टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा पार केला आहे. साखर व धान्य आधारित मिळून इथेनॉलचा तेल कंपन्यांशी झालेला करार 647 कोटी लिटरचा होता. यापैकी 328 कोटी लिटरचा पुरवठा मे अखेर तेल कंपन्यांना झाला आहे. अजूनही मागणीच्या तुलनेत समाधानकारक इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी इथेनॉल प्रकल्प धडपडत आहेत. केंद्राने आणलेल्या इथेनॉल प्रकल्पावरील निर्बंधाचे सावट इथेनॉल निर्मिती आणि पुरवठ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. इथेनॉल पुरवठ्याचा भार अजूनही साखर उद्योगावरच असल्याचे इथेनॉल पुरवठ्यावरून दिसत आहे. फेब्रुवारीअखेर पर्यंत मिश्रणाचे प्रमाण 11.60 टक्के होते.
साखर आधारित प्रकल्पामधून 231 कोटी लिटरचा करार झाला होता. त्यापैकी उद्योगातून 166 कोटी लिटरचा पुरवठा तेल कंपन्यांना झाला. उसाच्या रसापासून 64 कोटी लिटर इथेनॉलचा करार होता, त्यापैकी 54 कोटी लिटरचा पुरवठा झाला. बी. हेवी मोलॅसेस 113 कोटी लिटरचा करार झाला तर पुरवठा 54 कोटी लिटरचा झाला आहे. सी हेवी मोलॅसेसच्या माध्यमातून तयार झालेल्या इथेनॉलचा 82 कोटी लिटरचा करार झाला. तर पुरवठा 28 कोटी लिटरचा झाला.
धान्य आधारित इथेनॉलचा करार 416 कोटी लिटरचा झाला होता. यापैकी फक्त 162 कोटी लिटरचा पुरवठा झाला आहे. यामध्ये खराब अन्नधान्यापासूनचा 245 कोटी करार इथेनॉलपैकी 96 कोटी इथेनॉलचा पुरवठा झाला आहे. तांदळापासून तयार झालेल्या इथेनॉलचा करार 21 कोटी लिटरचा होता. परंतु केंद्राच्या बंदीमुळे तांदळापासून तयार झालेल्या इथेनॉलचा पुरवठा अजिबातच झाला नाही.
सध्या उसाचा हंगाम संपला आहे. बी हेवी, सी हेवी मोलॅसिस पासून अजूनही इथेनॉल तयार होवू शकते. पण साखर आणि उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीपुढील हंगाम सुरू होईपर्यंत थंडावण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत उसाच्या रसापासून इथेनॉलचा पुरवठा मागणीपेक्षा जास्त होता.
इथेनॉलच्या उतपादनासाठी धान्यावर आधारित डिस्टलरींना अनुदानित तांदळाची विक्री पुन्हा सुरू करण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नसल्याचे केंद्रीय अन्न व पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले. केंद्राने इथेनॉल निर्मितीला जोर दिला असला तरी कमी उत्पादनामुळे मक्यापासून इथेनॉल निर्मितीवरही मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. (अॅग्रोवन, 04.06.2024)