सोमेश्वरनगर: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून यंदाच्या हंगामासाठी 3173 रुपये ’एफआरपी’ निश्चित झाली आहे. कारखान्याने आजवर 2800 रुपये सभासदांच्या खात्यावर जमा केले आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता 31 मार्चपूर्वी ’एफआरपी’ची उर्वरित रक्कम 373 रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केली जाणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.’सोमेश्वर’ने यापूर्वी उसाचा पहिला हप्ता जाहीर केला होता. ’एफआरपी’ एकरकमी मिळावी, अशी मागणी सभासदांसह शेतकरी कृती समितीची होती.
उच्च न्यायालयाने ’एफआरपी’ एकाच हप्त्यात द्यावी, असा निर्णय नुकताच दिला. त्यानुसार आता सोमेश्वर कारखाना उर्वरित रक्कम 31 मार्चपूर्वी उत्पादकांच्या खात्यावर जमा करणार आहे. त्यानुसार आता 15 नोव्हेंबर ते 15 मार्च या कालावधीत गाळप झालेल्या उसापोटी उत्पादकांना 45 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
यासंबंधी जगताप यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, चालू गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत 12 लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून, अजून 20 ते 25 हजार टन ऊस शिल्लक आहे. मार्चअखेरपर्यंत हंगाम बंद होणार आहे. ऊसटंचाई असतानाही सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या सहकार्याने चांगले ऊस गाळप केले असल्याचे जगताप यांनी सांगितले.सोमेश्वर कारखान्याच्या मालकीचे असलेले मु. सा. काकडे महाविद्यालय हा सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
गेल्या 30 वर्षांपासून महाविद्यालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. सर्व सभासदांनी कारखान्याचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवावा. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून, सभासदांना यानिमित्ताने आश्वासित करत असल्याचे जगताप म्हणाले.
गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल महिना अखेरीस
सोमेश्वर कारखान्याच्या टाइम ऑफिसमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी दोन चौकशी समित्या नेमल्या आहेत. महिनाअखेरपर्यंत चौकशी अहवाल मिळणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.