बारामती : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना उसाचा पहिला हप्ता प्रतिटन रुपये २,८०० रुपये जाहीर करण्यात आला आहे. हा पहिला हप्ता लवकरच ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. या हंगामातील अंतिम साखर उतारा व साखरेचे दर विचारात घेऊन अंतिम ऊस दर देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले.सभासदांच्या मालकीची ही संस्था टिकावी, यासाठी सर्वच सभासदांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जास्तीचे गाळप झाले तर साखर व मोलॅसेस उत्पादन, तसेच वीजनिर्मिती इत्यादींमध्ये वाढ होईल. पर्यायाने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊन कारखाना आर्थिक अडचणीमधून बाहेर पडण्यास मदत होईल. त्यासाठी सभासदांनी चालू गळीत हंगामात त्यांचा ऊस इतर कारखान्यांना गळितास न देता आपलेच कारखान्यास गळितास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष काटे यांनी केले आहे.
यंदा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ८ लाख मे.टन ऊस गळितासाठी उपलब्ध असून कार्यक्षेत्राबाहेरील २ लाख मे.टन असे एकूण १० लाख मे.टन उसाचे गाळप करण्याचे संचालक मंडळाने उद्दिष्ट ठरविले आहे. आत्तापर्यंत ३ लाख ६ हजार ५७२ मे.टन उसाचे गाळप होऊन सरासरी १० टक्के रिकव्हरीने २ लाख ९७ हजार ५०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झाले आहे. तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पातून १,५५३,७०० युनिट्स वीजनिर्मिती झाली असून त्यापैकी अंतर्गत वापरासाठीची वीज वजा जाता ९९,९४,००० युनिट्स वीज निर्यात झाली आहे.चालू वर्षी कारखान्याने १० लाख मे.टन गाळप गृहीत धरून ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेस ॲडव्हान्स वाटप केलेला आहे. तसेच कारखान्यातील मशिनरी रिपेअरिंग व ओव्हरहॉलिंग इत्यादीसाठी खर्च केल्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले.